अमरावती : प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्‍यक्ष आमदार बच्‍चू कडू यांच्‍या नेतृत्‍वात उद्या ९ ऑगस्‍ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्‍यावर प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना बच्‍चू कडू यांनी “मोर्चा कुठल्‍याही परिस्थितीत निघणार असून पोलिसांनी मोर्चा अडविण्‍याचे धाडस करू नये, अन्‍यथा आम्‍ही प्रत्‍युत्‍तर दिल्‍याशिवाय राहणार नाही”, असा इशारा दिला आहे.

बच्‍चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होण्‍यापूर्वी प्रसार माध्‍यमांशी बोलताना सत्‍तेत राहायचे की नाही, याचा निर्णय आपण उद्या घेणार असल्‍याचे सांगितले. बच्‍चू कडू म्‍हणाले, आम्‍ही शांततेच्‍या मार्गाने हे आंदोलन करणार आहोत. पोलिसांना आमची विनंती आहे, की मोर्चेकऱ्यांना अडवू नये, अन्‍यथा आम्‍ही प्रत्‍युत्‍तर देऊ. उद्याचा मोर्चा निघणार म्‍हणजे निघणारच.

हेही वाचा : दत्ता मेंघेंचे पुतणे काँग्रेसमध्ये दाखल; भाजपातील बड्या कुटुंबास खिंडार…

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जावी, दोन वर्षे व्‍याज आणि मुद्दलात ५० टक्‍के सवलत देण्‍यात यावी, पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामे रोजगार हमी योजनेमार्फत घेण्‍यात यावी, फळबाग योजना सुलभ करावी, अशा अनेक मागण्‍या सरकारकडे करण्‍यात आल्‍या आहेत, असे बच्‍चू कडू म्‍हणाले.

आमदार बच्चू कडू हे महायुती सोबत असले तरी देखील गेल्‍या काही महिन्यांपासून त्यांनी महायुती विरोधात भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत देखील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांनी स्वतंत्र उमेदवार दिला होता. त्यामुळे बच्चू कडू महायुती सोबत राहणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली जात होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत. राजू शेट्टी, इम्तियाज जलील, रविकांत तुपकर यांच्यासह अनेक छोट्या पक्षाच्या नेत्यांनी आता तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत. या संदर्भात बच्चू कडू यांची नेमकी भूमिका काय? हे या मोर्चात जाहीर करणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. त्यामुळे या मोर्चाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : आई ती आईच! दुरावलेल्या बछड्यांसाठी ‘ती’ ट्रॅपमध्ये शिरली अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार बच्‍चू कडू यांचा प्रहार जनशक्‍ती पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेण्‍याच्‍या तयारीत आहे. या तयारीचा एक भाग म्‍हणून त्‍यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्‍टकरी, दिव्‍यांगांच्‍या प्रश्‍नांवर ९ ऑगस्‍टला मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्‍याने संघर्ष होण्‍याची शक्‍यता आहे.