अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या आठवड्यात बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह केला. सात दिवसांनंतर त्यांनी हे आंदोलन स्थगित केले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. बच्चू कडू यांना घेरण्यासाठी विरोधक वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच खेळत आहे. त्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बच्चू कडू म्हणाले, आपल्याला जिल्हा बँकेच्या संचालक पदावरून अपात्र ठरविण्यात आले, हे आपल्याला सर्वप्रथम माध्यमांकडूनच कळले. मला अपात्र ठरवले जाते आणि त्याची साधी नोटीसही आपल्याला दिली जात नाही, याचे आश्चर्य वाटते. आपल्यावरील ही कारवाई सूडबुद्धीतून करण्यात आली आहे. काँग्रेसच्या काही संचालकांनी आपल्याला अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. त्यांचा वापर करून भाजपने ही कारवाई करण्यास भाग पाडले आहे. ही संविधानाची पायमल्ली आहे.
कारवाईची माहिती माध्यमांना दिली जाते, मला ते माध्यमांमधून कळते. नाशिक न्यायालयाच्या निर्णयाला आपण उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या आदेशाची ही अवमानना आहे का, हे तपासले जाईल. लवकरच आपण याविषयी विस्तृत माहिती जनतेसमोर मांडून पण, ही काँग्रेस आणि भाजपने मिळून केलेली ही कारवाई दिसत आहे.
बच्चू कडू म्हणाले, आपण सरकारच्या विरोधात बोलू नका, अन्यथा आपल्याला कुठेतरी अडकविण्याचा प्रयत्न केला जाईल, येत्या काही महिन्यात बच्चू कडूला संपवायचे, असे विरोधकांनी ठरविल्याची माहिती आपल्याला एका अधिकाऱ्याने दिली होती. ही एक प्रकारे धमकीच होती. हे आपल्याला अपेक्षितच होते. आपला आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे, पण आपण आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे बच्चू कडू यांनी सांगितले. विभागीय सहनिबंधकांच्या या आदेशाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असे ते म्हणाले.
राजकीय संबंध नाही- आमदार प्रवीण तायडे
बच्चू कडू यांना जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून अपात्र ठरविण्याचा हा जिल्हा विभागीय सहनिबंधकांनी घेतला आहे. त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. काँग्रेसच्या संचालकांनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. हे जुने प्रकरण आहे. त्याचा बच्चू कडू यांनी केलेल्या उपोषणाशीही संबंध नाही, असे अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी सांगितले.