अमरावती: भाजपच्या नेत्या, माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या टीकेला प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बुधवारी अत्यंत कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले. नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधताना कडू म्हणाले, ‘राणांच्या एवढे नाटकी दाम्पत्य या देशात कुठेही दिसणार नाही. बायको भाजपमध्ये आणि नवरा युवा स्वाभिमान संघटनेत. राणांची बायकोच त्यांच्या संघटनेत राहू शकत नसेल, तर मी काय बोलणार’. बच्चू कडू यांच्या या टीकेमुळे दिवाळीतही आरोप-प्रत्यारोपांची तुफान फटकेबाजी सुरू झाली आहे.
मंगळवारी नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर ‘नौटंकी’ आणि ‘कोट्यवधींची संपत्ती’ जमविल्याचा आरोप केला होता. यावर कडू यांनी राणा दाम्पत्याचा खरपूस समाचार घेतला.
कडू म्हणाले, तुम्हीच गटार गंगेत उभे आहात, त्यानंतरही तुम्ही राज व उद्धव ठाकरेंवर टीका करत आहात. तत्पूर्वी, तुम्ही बायको भाजपमध्ये व नवरा युवा स्वाभिमानमध्ये का? याचे उत्तर द्या. याला कसला स्वाभिमान म्हणायचे? ना मान, ना स्वाभिमान. दिवाळीच्या दिवशीही राणांना माझी आठवण येते. त्यांना देवधर्म आठवत नाही. हा किती जिव्हाळा आहे, किती प्रेम आहे, अशा शब्दात कडू यांनी खोचक टीका केली.
बच्चू कडू म्हणाले, सगळ्या पक्षांचे पाठिंबे घेऊन तुम्ही निवडणुका लढता. कधी मशिदीत तर कधी मंदिरात जाता. कधी नमाज पढायचा, तर कधी प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन राजकारण करता. पण मी मरेपर्यंत कुणाच्याही ओंजळीने पाणी पिणार नाही. कुण्या पक्षाचा पाठिंबा घेऊन आम्ही आमदार होणार नाही. आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्क्रिप्ट मिळाल्यानंतर तुम्ही दोघे बोलू लागलात, असा गंभीर आरोपही कडू यांनी यावेळी केला.
बच्चू कडू म्हणाले, भाजप व मोदींना शिव्या देणाऱ्या आता भाजपच्या नेत्या झाल्यात. हे राणा दाम्पत्य शेतकरी विरोधी आहे, शेतमजुरांविरोधात आहे. एकेक थैली किराणा दिला म्हणजे दिव्यांगांच्या समस्या संपल्या का? तो आयुष्य कसा काढतो? कसा जगतो? हे पाहणे महत्त्वाचे आहे. विधानसभेतील कामाचा उल्लेख करत ते म्हणाले, मी आमदार, मंत्री असताना दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलो होतो. याउलट हे राणा अत्यंत लाचार दाम्पत्य आहे. त्यांना वरून कार्यक्रम मिळाल्यानंतर बोलावेच लागते. असे म्हणत त्यांनी नवनीत राणा यांना आपल्या भाषणांची कॅसेट पाठवावी लागेल, असा उपहासात्मक टोलाही लगावला.
