अमरावती : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे हे मुंबईत उपोषण सुरू करणार असल्याने ऐन गणेशोत्सवाच्या काळात सरकारची कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे येत्या २८ ऑक्टोबरला मुंबईत धडक देणार आहेत. त्याआधी बच्चू कडू यांनी प्रत्येक जिल्ह्यात पाच ते सहा सभांचे नियोजन केले आहे. बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविषयी भाष्य केले आहे.
बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे योग्य वाटत असेल, त्यांनी ती भूमिका घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आंदोलन व्हावे की व्हायला नको, हे ठरवावे. आंदोलनाविषयी काय निर्णय घ्यावा, हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे. आंदोलन कसे हाताळायचे, हे त्या त्या राज्याच्या प्रमुखाचे कौशल्य असते. मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन कसे हाताळायचे हा त्यांचा प्रश्न आहे.
बच्चू कडू म्हणाले, शेतकरी कर्जमाफी, हमीभावावर (एमएसपी) २० टक्के अधिक दर देण्याबाबत सरकार निर्णय घेण्यास विलंब करीत आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या कुटुंबावर आर्थिक परिणाम होत आहे. राज्य सरकारला शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी शेतकरी, शेतमजूर हक्क संघर्ष समिती मुंबईत लाखोंच्या संख्येने जाऊन ठिय्या आंदोलन करणार आहे. शेतकरी कर्जमाफी आणि विविध प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी शेतकरी संघटनांच्या संघर्ष समितीची स्थापना झाली आहे.
बच्चू कडू म्हणाले, शेतकरी जागृतीसाठी विदर्भापासून कोकणापर्यंत संपूर्ण राज्यात सभा घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात पाच ते सहा सभा घेतल्या जातील. आधी आम्ही २ ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. आता २८ ऑक्टोबर ही तारीख ठरविण्यात आली आहे. ३० ऑगस्टला वाशीम, बुलढाणा जिल्ह्यात सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
बच्चू कडू म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढाई मोठी आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क हवा आहे. शेतकरी आंदोलनासाठी बाहेर पडत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करूनही मते मिळत नाहीत, अशी नकारात्मक भूमिका काही लोक मांडतात, पण आम्ही त्याचा विचार करीत नाही. शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी जागरूक असावे, हीच आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आधीही आंदोलने केली यापुढेही करीत राहू, मागे हटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.