नागपूर : १४५ वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेला पौराणिक, धार्मिक आणि सामाजिक महत्त्व असलेला, ‘बडग्या-मारबत’ महोत्सव शनिवारी उत्साहात पार पडला. बुधवारी जागनाथ येथून ‘पिवळी मारबत’ची मिरवणूक काढण्यात आली, तर नेहरू पुतळा येथून ‘काळी मारबत’ची मिरवणूक काढण्यात आली. दोन्ही मारबतचे नेहरू पुतळा चौकामध्ये मिलन झाले. त्यानंतर दोन्ही मारबत आपल्या मार्गाने मार्गस्थ झाले. हा मिलन सोहळा बघण्यासाठी लाखो लोकांनी गर्दी केली होती.

१४५ वर्षांची परंपरा नागरिकांनी जपली : जगप्रसिद्ध तसेच ऐतिहासिक, पौराणिक यासह धार्मिक परंपरेची जोड असलेला बडग्या-मारबत उत्सवाचं आज नागपूरात आयोजन करण्यात आलं होतं. बडग्या आणि मारबत जगातला एकमेव असा उत्सव आहे जो, भारतात केवळ नागपूरात साजरा केला जातो. हा ऐतिहासिक परंपरा गेल्या १४५ वर्षांपासून अविरतपणे नागरिकांनी जपली आहे.

पोळ्याच्या पाडव्याला निघते मिरवणूक : पोळ्याच्या पाडव्याला बडग्या-मारबत उत्सवाचं आयोजन केलं जाते. हजारो, लाखोंच्या संख्येत नागपूरकर या उत्सवात सहभागी होतात. तर, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यातील नागरिक देखील हा ऐतिहासिक उत्सव बघण्यासाठी यंदा आले होते. गेल्या १४५ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. या मिरवणुकीच्या दरम्यान ‘ईडा पिडा, रोग राई, जादु टोना घेऊन जागे मारबत’ अश्या घोषणा दिल्या जातात.