वर्धा : निसर्गाच्या विविध घटकांचे रक्षण करण्यास आता अनेक संस्था पुढे येत आहे. बहार ही अशीच एक संस्था. विविध पक्षीनोंद ठेवणे, त्यांचा अभ्यास करणे, स्थलांतरित पक्षी व त्यांचा अधिवास तसेच पक्षी सूची दरवर्षी जाहीर करण्याचे काम बहार नेचर फॉउंडेशनतर्फे होत असते. याच संस्थेने पक्ष्यांचे संवर्धन करणाऱ्या गावांना भेटी देण्याचा उपक्रम सूरू केला. पहिल्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यातील सारसग्रामची वारी झाली. तेव्हा दासगाव येथील धानशेतीत सारस म्हणजेच क्रोच पक्षी आढळला. उडणाऱ्या पक्ष्यात सर्वात उंच पक्षी म्हणून सारस ओळखल्या जातो. ५ फूट ११ इंच इतक्या उंचीचा आढळून आला आहे.
या भेटीत सारस जोडीचा एकत्र आहार विहार, साद प्रतिसाद तार सप्तकातील आवाज, पदन्यास, उड्डाण असे क्षण टिपता आल्याचे संजय इंगळे सांगतात. गोंदियाचे मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे यांनी माहिती दिली.
सारस हा आता दुर्मिळ होत चाललेला पक्षी आहे. महाराष्ट्रात या घडीस फक्त ३९ सारस शिल्लक आहेत. हा पक्षी कधीच झाडावर बसत नाही. एकदा जमिनीवर जागा निवडली की तो वर्षानुवर्षे त्याच भागात पिल्लांसह वास्तव्य करतो. त्यामुळे पूर्वीच्या काळात त्याची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. सारसची अंडी आकाराने मोठी म्हणून ती मनुष्य व अन्य प्राण्यांचे भक्ष्य ठरली. हा पक्षी ऐन पेरणी काळात शेतात घरटी बांधतो. दोन मिटरचा घेर असलेले घरटे व त्या भोवतालची जमीन त्यात गुंतते. परत भाताची रोपे, धानाच्या दांड्या खुडून सारस आपले घरटे बांधतो. या गोष्टी शेतमालकास खूप अडचणीच्या वाटतात. म्हणून सारसांना हुसकावून लावण्याचे प्रकार झाले. ही प्रजाती संकटात येत असल्याने गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी लोकांनी सारस संवर्धन करण्यास पुढाकार घेतला. प्रशासनानेही साथ दिली. शेतात अधिवास असणारे शेतकरी हे सारस मित्र झाले. या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून शेतात सारस घरटे असणाऱ्या शेतकऱ्यास दरवर्षी २५ हजार रुपयाची मदत दिल्या जाते, अशी माहिती तिगावकर यांनी दिली.
गतवर्षी या भागात २८ तर यावर्षी ३९ सारस आढळून आले, ही समाधानाची बाब म्हटल्या जाते. प्राचीन ग्रंथात कौंच पक्षी असा उल्लेख असलेला हा सारस एकदाच आपला जोडीदार निवडतो आणि आयुष्यभर आपल्या जोडीदारासोबतच संसार करतो.
जुलै ते ऑक्टोबर हा सारस पक्ष्यांचा विणीचा काळ. मादी सामान्यतः दोन-तीन अंडी घालते. कधी कधी एक तर क्वचितच चार अंडीही ती देते. या अंड्यांची राखण आणि ती उबविण्याच्या सुमारे ३४-३५ दिवसांच्या या प्रक्रियेत दोघांचाही सातत्यपूर्वक सहभाग असतो. जोडीदारापैकी एक आहार घेत असताना दुसरा अंड्यांची काळजी घेतो. घरट्याजवळ अन्य पशुपक्ष्याचा किंवा कोणत्याही प्रकारचा धोका जाणवल्यास कर्कश्श आवाज करीत सारस संकटाला हुसकावून लावतो.
सारसांची जन्माला आलेली पिले पुढे ३ महिने आईबाबांसोबत राहतात आणि नंतर स्वतंत्रपणे विहार करू लागतात. वर्षभरानंतर वयस्क पिले स्वतःचा जोडीदार शोधतात आणि स्वतंत्र संसार थाटण्याचा त्यांचा प्रवास सुरू होतो. अशी रंजक माहिती या भेटीत पुढे आली. बहारचे डॉ. बाबाजी घेवडे, दीपक गुढेकर, जयंत सबाने, देवर्षी बोबडे, अतुल शर्मा, डॉ. आरती प्रांजळे, दर्शन दुधाने यांच्या मार्गदर्शनात ही पक्षी भेट संपन्न झाली.