वर्धा : वन्य प्राण्यांची शिकार हा चिंतेचा विषय ठरत आहे. शेड्युलमध्ये असलेल्या प्राण्यांची पण शिकार होत असल्याने सरकार सजग झाले आहे. तसेच वन्यजीव प्रेमी व सामान्य नागरिक यांच्यासाठी पण हा जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. म्हणून शिकार टाळण्यासाठी प्रबोधन आवश्यक ठरते. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या सूचनेनुसार वर्धा जिल्हा व्याघ्र कक्ष समितीची बैठक झाली. चारही उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या क्षेत्रातील सर्व पोलीस पाटील यांस हजर होते. या स्वरूपातील ही अशी पहिलीच अशी बैठक होती.
पोलीस पाटीलच कां ? तर गावात कोणीही नवखा आल्यास, विक्रेते, फेरीवाले आल्यास, गावालागत पालव पडल्यास, संशयास्पद हालचाल दिसल्यास त्याची नोंद मुसाफिरी पुस्तिकेत करण्याची जबाबदारी असते. अप्रत्यक्षपाने हा पोलीस पाटील गावाचा जागल्या असतो. म्हणून जंगल क्षेत्रालगत गावे असणाऱ्या भागातील पोलीस पाटील शिकार टाळण्यात महत्वपूर्ण ठरतात. त्यांना अधिक सक्रिय करण्यासाठी वन विभाग व पोलीस खाते दक्ष झालेत. या बैठकीत पीपल्स फॉर ऍनिमल्स या संस्थेचे विभागप्रमुख व सचिव आशिष गोस्वामी यांनी मार्गदर्शन केले.
वाघाच्या शिकारित प्रामुख्याने बहेलिया टोळीचा बोलबाला आहे. त्यांची शिकार करण्यासाठी चाललेली प्राथमिक तयारी टिपने महत्वाचे ठरते. जंगल भागापासून ३०, ४० किलोमीटर अंतरावर ते आपला तंबू ठोकतात. आयुर्वेदिक जडिबुट्टी किंवा हिमालयीन औषधी विकण्याचा धंदा असल्याचे सांगतात. गावाशी संपर्क वाढवितात. पुरुष दिवसभर बाहेर असतात. तर या कुटुंबातील महिला गावात विक्री करण्यास जातात. गरजू असल्याचे सांगत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतात. तिकडे पुरुष जंगलाच्या वाटा शोधतात. औषधी वनस्पती शोधत असल्याचे सांगतात.
बऱ्याच गावात हिंस्त्र प्राण्यांचा त्रास असतो. हल्ले होतात. बाया त्याची माहिती घेतात. राखण करणे कठीण झाल्याचा सूर ऐकायला मिळाल्यास या बाया घरचा पुरुष राखणदारी करू शकतो, असे सांगतात. त्रस्त गावकरी पटकन त्यास बळी पडतात. हा बहेलिया पुरुष मग राखणदार बनतो आणि त्याचा शिकारीचा मार्ग मोकळा होतो. रातोरात शिकार आटोपली की तंबू घेऊन ते पसार होतात. म्हणून असे अनाहुत लोकं गावात आल्यास त्वरित पोलिसांना कळविण्याचे सांगण्यात आले.
दुसरी कंजर समुदायतील काही वन्य शिकारित आहेत. तसेच आंध्र भागातील महिलांच्या काही टोळ्या आहेत. त्या केसं विकत घेण्याच्या निमित्ताने गावोगावी फिरतात. केसाळ प्राणी असलेल्या भागात त्या शिरून खवले मांजरची शिकार करतात. अशी माहिती गोस्वामी यांनी दिली. पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील हे वन्यजीवांची शिकार रोखू शकतात. या प्राण्यांच्या तस्करीचा करोडो रुपयाचा बाजार आहे. त्यातील चोरटे ओळखून तस्करीवर आळा घालण्याचे आवाहन करण्यात आले. शिकार पद्धत ओळखने, शिकारीबाबत पोलिसांकडून अपेक्षित दक्षता, नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली होती. मानधन मिळत असले तरी शिकार रोखण्यात विशेष कामगिरी केल्या शासनाकडून विशेष बक्षीस किंवा रिवार्ड पण दिल्या जात असतात.