अकोला : बारमध्ये मनसोक्त मद्यप्राशन करून तरुण बाहेर आला. मद्याचे अतिसेवन केल्याने बारच्या बाहेरच तो जमिनीवर पडला. त्यानंतर बारमालक चारचाकीने घरी जात असतांना त्याखाली तरुण चिरडल्या गेला. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. सीसीटीव्हीमध्ये ही धक्कादायक घटना कैद झाली असून बार्शीटाकळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी बारमालकाला अटक केली आहे.
बार्शीटाकळी पोलीस ठाण्यांतर्गत गावातील सुरज वाईन बार समोरील मोकळ्या जागेत एक अनोळखी मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. तपासामध्ये मृतक अफसर खॉ रशीद खॉ (वय ३३ वर्ष रा. बार्शीटाकळी) असे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी बारचे सीसीटीव्हीमध्ये झालेले चित्रिकरण तपासले. त्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला.
२६ ऑक्टोबर रोजी रात्री १०.१५ वाजता मृतक दारूच्या नशेत बारच्या बाहेर आला. अति मद्यप्राशन केल्यामुळे नशेत तो बारसमोरच खाली पडला होता. त्याचवेळी बारचा मालक संतोष शंकरराव काळदाते आपल्या चारचाकीने घरी जाण्यासाठी निघाला. त्यावेळी बारच्या बाहेर पडलेला मृतक बार मालकाच्या चारचाकी वाहनाच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली सापडला. वाहन वळवत असताना मृतकाच्या अंगावरून चाक गेले. मृतक वाहन चालकाच्या डाव्या बाजूला असल्याने मृतक दिसला नव्हता. निष्काळजीपणे वाहन चालवल्याने घटनास्थळीच तरुणाचा मृत्यू झाला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी वाईन बार मालक संतोष शंकरराव काळदाते याला ताब्यात घेऊन बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात कलम १०६, २८१, २३९ भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारचाकी वाहन देखील ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस करीत आहेत.
कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
तेल्हारा पोलीस ठाण्यांतर्गत अडसुळ ते अंदुरादरम्यान मार्गावर एक अनोळखी मृतदेह आढळला आहे. अंदाज ४० वर्ष वयोगातील पुरुषाचा मृतदेह असून कुजलेल्या अवस्थेत तो आढळून आला. तेल्हारा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून घटनास्थळीच शव परीक्षण वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. या प्रकरणी समाजमाध्यमांवर अफवा पसरवली जात असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन तेल्हारा पोलिसांनी केले आहे. या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.
