चंद्रपूर : महाराष्ट्र -तेलंगणा सीमावादात असलेल्या जिवती तालुक्यातील कामतगुडा या गावाच्या पूर्व दिशेला दोन कि.मी. अंतरावर बेसाल्ट दगड व शिला आढळून आल्या आहेत. महाराष्ट्र भूगर्भ वैज्ञानिकांना याची खबरही मिळाली नाही. मात्र, तेलंगणा शासनाला याची माहिती मिळताच भूगर्भ वैज्ञानिक टीम पाठवून या स्थळाचा अभ्यास करित आहे. येथील दगड तपासणी करिता पाठविले जात आहे.

महाराष्ट्र राज्याच्या हद्दित हे गाव असतानाही महाराष्ट्र भूगर्भ वैज्ञानिक याकडे कानाडोळा का करत आहे हा प्रश्न आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील कामातगुडा गावालगत गेल्या अनेक दिवसांपासून तेलंगणा राज्यातील भूगर्भ वैज्ञानिकांकडून या स्थळाचा अभ्यास केला जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे बेसाल्ट दगड व शिला ६५० दशलक्ष वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज त्यांच्याकडून वर्तविले जात असतानाही महाराष्ट्र शासनाच्या भूगर्भ वैज्ञानिकांना गंधही आला नाही, ही आश्चर्याची बाब आहे. डोंगराळ भागात वसलेल्या या पहाडावर माणिकगढ किल्ला, शंकरलोधी येथील भुयार व प्राचीन शिला अजूनही सुस्थितीत आहेत, मात्र, त्या क्षेत्राचा सखोल अभ्यास झाला नसल्यामुळे आजही ते क्षेत्र दुर्लक्षित आहे. असे असताना आता कामतगुड्यालगत बेसाल्ट दगड व शिला (शिळा) आढळल्या असून त्यांचा अभ्यास महाराष्ट्र भूगर्भ वैज्ञानिकांकडून होणे अपेक्षित आहेत.

हेही वाचा – ग्रंथालये होणार सक्षम; अर्धवेळ ग्रंथपाल आता पूर्णवेळ

कामतगुडा येथे उपलब्ध असलेल्या शिळा व बेसाल्टचा दगड हा ६५० दशलक्ष वर्षांपूर्वीचा असल्याचा तेलंगणा भूगर्भ वैज्ञानिकांचा दावा आहे. हे ठिकाण पूर्णपणे महाराष्ट्रात असून शासनाने याची दखल घ्यावी, असे लोकनियुक्त सरपंच चिखली (खु), वर्षाराणी सुनील जाधव म्हणाल्या.

हेही वाचा – धक्कादायक! नागपुरात मेडिकलच्या आवारातच कचऱ्यासोबत जैववैद्यकीय कचऱ्याची ‘होळी’; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथील उपलब्ध शिळा व दगड हे बेसाल्टच आहे, तसेच या स्थळाला ऐतिहासिक वारसा आहे हे समजल्यावर आम्हाला खूपच आश्चर्य वाटत आहे. हा भूभाग महाराष्ट्र राज्याचा परंतु येथे तेलंगणामधील अधिकारी येऊन हे आमचा प्रदेश असल्याचा दावा करित आहेत, हे आमच्यासाठी खूपच दुर्भाग्य आहे. महाराष्ट्र शासन आतातरी येथील स्थळाची दखल घेईल, अशी आशा आहे, असे स्थानिक नागरिक उत्तम कंचकटले म्हणाले.