चंद्रपूर : भद्रावती येथील दुर्लक्षित लेंडाळा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्र शासनाच्या ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीवरून काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर व भाजप आमदार करण देवतळे यांच्यात श्रेयवादाची लढाई जुंपली आहे. खासदार धानोरकर यांनी, आपल्याच प्रयत्नांमुळे हा निधी मिळाल्याचा दावा केला आहे, तर भाजप आमदार करण देवतळे यांनी हे आपलेच श्रेय असल्याचे म्हटले आहे.

लेंडाळा हा भद्रावती येथील सर्वात जुना प्रकल्प आहे. राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीच्या ३ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता मिळाली होती, असा दावा खासदार धानोरकर यांनी केला. त्यावेळी विद्यमान खासदार बाळू धानोरकर व प्रतिभा धानोरकर या विद्यमान आमदार होत्या. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी झालेल्या आमदारांनी या कामाचे फुकटचे श्रेय लाटू नये, असे धानोरकर म्हणाल्या. या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळण्यामागे आपण सातत्याने पाठपुरवा केल्याचेही त्यांनी सांगितले. भद्रावती नगर परिषदेमार्फत वेळोवेळी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांचा यात मोलाचा वाटा आहे. आपण आमदार असताना २०१९-२० मध्ये हा विषय विधानसभेत मांडून त्याची आवश्यकता अधोरेखित केली होती. लोकसभा खासदार म्हणून नगर परिषदेच्या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा दिला आणि मंत्रालयीन पातळीवर विविध बैठकांमध्ये हा मुद्दा सातत्याने मांडत प्रकल्पाच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले, असे धानोरकर यांनी म्हटले आहे.

लेंडाळा तलावाच्या पुनरुज्जीवनाचे स्वप्न भद्रावतीच्या जनतेने पाहिले होते आणि आता त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. या प्रकल्पाचे यश हे केवळ कोणत्याही एका राजकीय व्यक्तीच्या श्रेयवादापुरते मर्यादित नसून ते भद्रावतीच्या जनतेच्या हितासाठी आहे. केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी श्रेय घेण्याचे प्रयत्न अत्यंत खेदजनक आहेत, असा टोलाही धानोरकर यांनी लगावला.

दुसरीकडे, लेंडाळा तलावासाठी आपणच निधी आणला, असा दावा भाजप आमदार देवतळे यांनी पत्रकाद्वारे केला आहे. आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि राजकीय इच्छाशक्ती यासाठी निर्णायक ठरली. आपण केंद्र शासनाच्या नागरी विकास मंत्रालयाशी सातत्याने पत्रव्यवहार केला, बैठका घेतल्या, प्रस्ताव सादर केले. तलावाच्या ऐतिहासिक, पर्यावरणीय आणि सामाजिक महत्त्वावर भर देत हे काम केवळ सौंदर्यीकरणापुरते मर्यादित न ठेवता एकात्मिक विकासावर भर दिला. या मंजूर प्रकल्पात तलावाची सखोल स्वच्छता, गाळ काढणे, काठाच्या मजबुतीकरणासह संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण, फिरण्यासाठी पायवाटांची निर्मिती, दिव्यांची व्यवस्था, बसण्यासाठी आसन व्यवस्था, पर्यटकांसाठी आकर्षक व्यवस्था आणि शहरवासीयांसाठी विश्रांतीचे उत्तम ठिकाण उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होईल, असेही देवतळे यांनी नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र शासनाच्या ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत भद्रावती येथील लेंडाळा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीवरून काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर व भाजप आमदार करण देवतळे यांच्यात श्रेयवादाची लढाई जुंपली आहे.