यवतमाळ : दंतचिकित्सा पदव्युत्तर पूर्व परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यवतमाळ येथील या तरुणीने पुणे येथे मामाच्या घरी बुधवारी हे टोकाचे पाऊल उचलले. गायत्री सतीश काळे (२५) रा. विश्रामगृहाजवळ रुईकरवाडी, यवतमाळ असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेने यवतमाळ येथे खळबळ उडाली आहे.
शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील गायत्री ही एकुलती एक कन्या होती. ती अभ्यासात हुशार होती. बारावीनंतर तिने वर्धा येथे बीडीएसचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर दंतचिकित्सा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एमडीएस पात्रता पूर्व परीक्षा तिने दिली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला. त्यात गायत्रीला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे सांगण्यात येते. या निकालानंतर ती नैराश्यात असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.
सतीश काळे हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ते पत्नी व मुलीसह पुण्यात म्हेवण्याकडे गेले होते. तेथे असतानाच एडीएस पूर्व परीक्षेचा निकाल लागला. गायत्रीला कमी गुण मिळाल्याने ती नाराज होती. मात्र कुटुंबीयांनी तिची समजूत काढली व पुन्हा अभ्यास करून प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. बुधवारी सकाळी तिने आई, वडील, मामा, मामींना थोडा वेळ झोपते असे सांगून ती पहिल्या मजल्यावरील खोलीत गेली.
तिचे आई, वडील मॉर्निंग वॉककरिता गेले. ते परत आल्यानंतर त्यांनी गायत्रीला आवाज दिला. मात्र दरवाजा ठोकून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला, तेव्हा गायत्री गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. हे दृश्य बघून तिचे आई, वडील, मामा, मामी यांच्या हृदयाचा ठोका चुकला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेची नोंद घेत पंचनामा केला.
पुणे येथे शवविच्छेदन करून गायत्रीचा मृतदेह यवतमाळ येथे आणण्यात आला. आज गुरुवारी सकाळी ११ वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकुलत्या एक उच्च शिक्षित मुलीने नैराश्यातून असे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
महिनाभरात चार विद्यार्थ्यांच्या आत्महत्या परीक्षेतील अपयश आणि कमी गुण मिळाल्याच्या तणावातून गेल्या महिनाभरात यवतमाळ जिल्ह्यात चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत पेपर चांगला न गेल्याने, कमी गुण मिळतील या भीतीतून दिग्रस येथे बारावीतील लकी सुनील चव्हाण या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याचे वडील शिक्षक आहेत. भावाने निकाल न सांगितल्याने आपण नापास झालो असे समजून यवतमाळ तालुक्यातील पांढुर्णा पिंपरी येथील बारावीत असलेल्या हिना ज्ञानेश्वर आडे या विद्यार्थिनीने निकालाच्या दिवशीच आत्महत्या केली. तर, यवतमाळ येथील कृषी नगरमध्ये राहणाऱ्या समर्थ देशमुख या बारावीतील विद्यार्थ्याने परीक्षा होताच कमी गुण मिळण्याच्या भीतीतून १३ एप्रिलला गळफास घेत आत्महत्या केली होती आणि आता वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या गायत्री काळे या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.