राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्र तर भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे विदर्भ ‘भकास’ होत चालला आहे, असा गंभीर आरोप अर्थतज्ज्ञ व राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी केला.

हेही वाचा >>> सूरजागड लोहखाणीतून होणाऱ्या जडवाहतुकीसाठी ‘माइनिंग कॉरिडॉर’ – पालकमंत्री फडणवीस

नागपुरातील रवीभवन येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रत्येक भागाचा विकास हा तेथील वन- जमीनीतील साधन- सामुग्री आधारित असायला हवा. महाराष्ट्रात सुपीक जमीन आहे. परंतु राज्यातील पश्चिम भागात (पश्चिम महाराष्ट्र) शरद पवार आणि विदर्भात नितीन गडकरी हे दोन्ही नेते वेगवेगळे स्वप्न दाखवत शेतीपयोगी जागेवर उद्योग, माॅल, हाॅटेल्ससह मनात येईल ते तयार करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देतात. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ भागातील शेती व साधन- सामग्री ही भकास होत आहे.

हेही वाचा >>> “उद्धव ठाकरेंचे भाषण मला ऐकायचे नाही, कारण….”; राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही नेत्यांची राजकीय मैत्री आहे. दोघांपैकी कुणालाही काही समस्या उद्भवल्यास ते सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात. त्यानंतर हा प्रश्न सोडवला जातो. विदर्भात घनदाट वने, वन्यप्राणी, नद्यांसह इतरही खूपच सुंदर स्थळे आहेत. येथे पर्यटनाच्यादृष्टीने विविध पद्धतीचा विकास शक्य आहे. येथे सौर उर्जा क्षेत्रातही मोठी संधी आहे तर विदर्भात खूप कापूस होतो. त्यामुळे कापसावर आधारित उद्योग शक्य आहे. परंतु येथे इतर उद्योगांवरच लक्ष दिले जाते. काँग्रेससह भाजपमध्येही घराणेशाही आहे. सध्या भाजपमधील निम्याहून अधिक नेते हे काँग्रेसचेच असल्याने दोन्ही पक्ष सामान्यांऐवजी उद्योजकांचाच विचार करणारे आहेत, असा आरोपही त्यांनी केला. भाजपचा प्रमुख उद्योग हा ‘रियल इस्टेट’चा असून या क्षेत्रातील काहींना मंत्री करण्याचा उपक्रम त्यातूनच राबवला जात असल्याचेही देसरडा यांनी सांगितले.