यवतमाळ : महात्मा गांधी यांच्या मीठाच्या सत्याग्रहाला पर्याय म्हणून लोकनायक बापूजी अणे यांनी पुसदनजीक धुंदीच्या जंगलात १० जुलै १९३० रोजी जंगल सत्याग्रह केला. सोमवारी या जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन साजरा करण्यासाठी गेलेले भाजपाचे आमदार निलय नाईक यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर आग्या मोहोळने हल्ला केला. मधमाशांनी डंख मारल्याने वन अधिकार्‍यांसह काहीजण जखमी झाले. अनपेक्षित झालेल्या या हल्ल्यामुळे हा स्मृतिदिन सोहळा उधळला गेला.

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील सोनेरी पान असलेला धुंदी बेलगव्हाण जंगलातील सत्याग्रह १० जुलै १९३० रोजी झाला. या जंगल सत्याग्रहाचे प्रणेते लोकनायक बापूजी अणे यांच्या बेलगव्हाण जंगलातील स्मृती शिळेजवळ गेल्या कित्येक वर्षांपासून अभिवादन सोहळा आयोजित करण्यात येतो. यासाठी वनविभाग व लोकनायक बापूजी आणि स्मृती प्रतिष्ठान पुढाकार घेते. सोमवारी या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे आमदार निलय नाईक प्रथमच सहभागी झाले होते. त्यांच्या समवेत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, अणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंतराव पाटील कान्हेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमेय नाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मनीष जाधव, यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य, भाजपाचे कार्यकर्ते, जंगल सत्याग्रहप्रेमी नागरिक, पत्रकार व वनअधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा – बुलढाणेकरांनो सावधान! हेल्मेट असेल तरच जिल्हा कचेरीत मिळेल प्रवेश

पुष्पांजली अर्पण करताना लोकनायक बापूजी अणे यांच्या तैलचित्राजवळ अगरबत्ती लावण्यात आल्या. अगरबत्तीच्या धुरामुळे वृक्ष फांद्यावरील आग्या मोहोळ मधमाशांचा थवा जमलेल्या गर्दीवर तुटून पडला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे स्मृतिदिन कार्यक्रम सोहळा सुरू करण्याआधीच गोंधळ उडाला.

हेही वाचा – पाळीव किंवा भटक्या श्वानांना माणसांचा लळा का लागतो?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मधमाशांचा हा हल्ला लक्षात येताच शेतकरी नेते मनीष जाधव यांनी धोक्याची पूर्वसूचना दिली व त्वरित बाहेर पडण्यास सांगितले. आमदार निलय नाईक यांच्यासह उपस्थित मंडळी बाहेर पडत असताना मधमाशांनी हल्ला चढविला. वनपरिक्षेत्राधिकारी प्रवीण राऊत यांनाही मधमाशांनी घेरले. डंख मारल्याने अनेकजण जखमी झाले. मधमाशांनी हल्ला चढवताच सर्वांनीच आपापल्या वाहनातून लगेच काढता पाय घेतला. त्यामुळे आग्या मोहोळ उडाले आणि आमदार, कार्यकर्ते कार्यक्रम अर्धवट टाकून पळाले, अशी चर्चा पुसदमध्ये रंगली आहे.