लोकसत्ता टीम नागपूर : बालेकिल्ला असलेल्या पूर्व विदर्भात भाजपला विधानसभा निवडणुकीपूर्वी धक्के बसायला सुरुवात झाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे उदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील भाजप नेते व फडणवीस यांचे निकटवर्तीय गोपाल अग्रवाल हे सुद्धा काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. याशिवाय शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरचे काही नेतेही काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांचे पक्षबदल महाराष्ट्रात नवीन बाब नाही. पूर्वी काँग्रेसमध्ये इतर पक्षातील नेत्यांचे प्रवेश होत असत आता ही जागा भाजपने घेतली. २०१४ नंतर विविध पक्षांच्या अनेक प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०२४ च्या निवडणुकीनंतर तसेच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी व शिवसेना या दोन प्रमुख पक्षात फूट पडल्यानंतर सर्वच विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलल्यामुळे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले किंवा अन्य पक्षात गेलेले काही नेते काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात वर्धेतून झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे उदय मेघे यांनी भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उदय मेघे यांनी त्यांचा निर्णय बदलावा म्हणून भाजपकडून प्रयत्न झाले. पण त्यात यश आले नाही. मेघे यांचे एक पुत्र समीर मेघे हे हिंगण्याचे भाजपचे आमदार आहेत, हे येथे उल्लेखनीय. आणखी वाचा-अबब! युवकाचे सव्वा किलोमीटर लोटांगण, बघ्यांची गर्दी अन्… अग्रवाल पुन्हा काँग्रेसमध्ये? काँग्रेसमध्ये असताना २७ वर्षे आमदार म्हणून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काम करणारे व २०१९ मध्ये भाजपमध्ये गेलेले गोंदियाचे माजी आमदार गोपाल अग्रवाल पुन्हा काँग्रेसमध्ये येणार, अशी चर्चा आहे. अग्रवाल हे फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. अग्रवाल यांना भाजपने २०१९ मध्ये गोंदियातून उमेदवारी दिली होती पण ते पराभूत झाले होते. तेथे अपक्ष विनोद अग्रवाल विजयी झाले होते. ते सध्या भाजपमध्ये गेल्याने गोपाल अग्रवाल यांची अडचण झाली आहे. यासंदर्भात गोपाल अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये तशी भावना आहे. फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. काँग्रेस माझ्यासाठी नवीन पक्ष नाही. ५० वर्षे या पक्षात मी काम केले आहे, असे ते म्हणाले. आणखी वाचा-अमरावती: शेतकऱ्यांच्या उपेक्षेने काँग्रेस संतप्त, जोरदार घोषणाबाजी करीत… "विदर्भातील प्रत्येक कार्यकर्ता व नेता मोदी, फडणवीस, गडकरी यांच्यावर प्रेम करणारा आहे. काही नेते नाराज असतील तर त्यांची पक्षाचे वरिष्ठ नेते समजूत काढतात व मार्ग निघतो. याचा अर्थ नेते पक्ष सोडणार असा होत नाही. काँग्रेस नेहमीच खोटा प्रचार करत आली आहे. लोकसभा निवडणुकीतही या पक्षाने हेच केले. या सर्व अफवा आहेत. पक्ष मजबूत आहे." -चंदन गोस्वामी, प्रवक्ते, भाजप.