गोंदिया : तिरोडा तालुक्यातील बेरडीपार येथे गेल्या दोन वर्षांपासून आरोग्यवर्धिनी केंद्राची सुसज्ज इमारत उभी आहे. परंतु, अजूनपर्यंत आरोग्य केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे किती दिवस शोभेची वास्तूच म्हणून ही इमारत उभी राहील? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्यवर्धिनी कार्यक्रम केंद्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. सार्वजनिक आरोग्यविषयीची सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातील सर्व उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे टप्याटप्याने आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रुपांतर करण्यात आले. केंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी पदावर आयुर्वेद, युनानी नर्सिंग पदवीधारकांसह १५ कर्मचारी नियुक्त केले जातात. आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्यसेवक, आशा कार्यकर्त्या यांच्या माध्यमातून आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये व त्याअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणाचा सरकारचा मानस आहे. तब्बल १३ प्रकारच्या आरोग्य सेवा या केंद्रामार्फत दिल्या जातात. त्यामुळे एक प्रकारे आरोग्य सुविधा आणि सेवा वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – नागपूर : कारने भरधाव जाताना टोकल्याने केले तिघांचे अपहरण, कुख्यात सुमित ठाकूरवर गुन्हा दाखल

महत्त्वाचे म्हणजे २०१८ पासून या केंद्राचे नामविस्तारही झाले आहे. आता आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी उपकेंद्र व आरोग्य वर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र अशी या आरोग्य केंद्रांची ओळख निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी बेरडीपार येथे ६.५ कोटी रुपये खर्च करून सुसज्ज आरोग्यवर्धिनी केंद्राची इमारत तयार करण्यात आली. इमारतीतील फर्निचर व इतर सोयीसुविधांसाठी जवळपास १ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. परंतु आवश्यक मनुष्यबळ, रस्ता व पाणी या सोयी सुविधांभावी शोभेची वास्तू ठरली आहे.

बेरडीपार आरोग्यवर्धनी केंद्राची इमारत बनवून तयार आहे. जेथे भव्य इमारत साकारण्यात आली आहे. तेथे जाण्याकरिता पक्का रस्ताच नाही, विशेष म्हणजे इमारतीच्या बांधकामापूर्वी येथे पक्का रस्ता तयार होणे आवश्यक होता. परिणामी परिसरातील जनतेला आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.

हेही वाचा – अत्याचार पीडितेचे छायाचित्र व्हायरल करणे पडले महागात, महिला डॉक्टरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्ता व पाण्याची सुविधा नाही, त्यामुळे केंद्र कार्यान्वित झाले नाही. विज पुरवठाकरिता जनित्र मंजूर झाले आहे. आवश्यक मनुष्यबळ व पाण्याची सोय व पक्का रस्ता तयार झाल्यानंतर आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी सांगितले.