गोंदियाः- अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री धर्मराव आत्राम हिला शरद पवार गटातून निवडणूक उमेदवारी देणार असल्याचे माजी गृहमंत्री  अनिल देशमुख यांनी येथे सांगितले.  सोमवारी २५ ऑगस्टला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा गोंदिया जिल्हा कार्यकर्ता गेळावा व पुढील विधानसभा निवडणुकी संदर्भात आढावा सभा झाली. त्यानिमित्त  अनिल देशमुख गोंदियाला आले होते. त्यांनी पत्रपरिषदेत ही घोषणा केली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, धर्मरावबाबानी मला अहेरीला येवून निवडणूक लढण्याचे आव्हान दिले आहे. बाबांनी  आधी स्वतःचे घर नीट सांभाळावे, त्यांची स्वतःची मुलगीच बाबाच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढायला तयार आहे. त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम हिने शरदचंद्र पवार यांची तीन वेळा भेट घेतली तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही भेटली.   वडिलांनी अजित पवार गटात जाण्याचा घेतलेला निर्णय मला मान्य नाही, असेही ती म्हणाली.धर्मरावबाबा आत्राम  कडक जॅकेट घालून फिरतात. ते पुढील काही दिवसात उतरणार आहे,असा खोचक टोला ही देशमुख यांनी लगावला.

हेही वाचा >>>अनिल देशमुखांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आव्हान, म्हणाले ” त्यांनी माझ्या विरूद्ध लढावे”

गोंदियात आजच्या आढावा बैठकी संदर्भात माहिती देतांना अनिल देशमुख म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट गोंदिया-भंडारा जिल्हयातील ७ विधानसभा जागेपैकी गोंदिया जिल्हयातील तिरोडा अर्जुनी मोरगाव आणि भंडारा जिल्हयातील तुमसर या तीन जागेवर आपला दावा करणार आहे. तीन ही जागेवर पक्षांनी आपली तयारी जोमाने सुरू केली.  कार्यकर्त्यांना या बाबतची माहिती या आढावा बैठकीतून देण्यात आली आहे.

आपण उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस विरोधात दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभातून लढणार का? या प्रश्नाच्या उत्तरात देशमुख म्हणाले की, पक्षश्रेष्ठींनी असे आदेश दिले तर त्यावेळी बघू…. असे म्हणत स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून कुठलाही वाद नाही, असे ही अनिल देशमुख या प्रसंगी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार दिनानाथ पडोळे, माजी नगरसेवक दिलीप पनकुले, बजरंगसिंह परिहार, गुड्डु बोपचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, महिला जिल्हाध्यक्ष वंदना डोंगरवार उपस्थित होते.