भंडारा : ‘भाजपमध्ये “देश प्रथम, नंतर पक्ष, नंतर मी” हे ब्रीद आता राहिलेले नाही. भाजप हा व्यापारी, सुपारी बाज व माफियांचा पक्ष झालेला आहे. यापूर्वी पक्षाने तिकीट देताना उमेदवाराकडे रक्कम व बँक बॅलन्स कधीच विचारला नव्हता, पण या वेळी स्त्री उमेदवारांना अशा प्रकारचे प्रश्न विचारून लाडक्या बहिणी म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री साहेबांच्या आयाती नेत्याने पक्षातीलच लाडक्या बहिणींचा अपमान केला आहे’ असा खळबळजनक आरोप भाजप भंडारा शहराच्या उपाध्यक्ष तथा माजी नगरसेविका वनिता कुथे यांनी केला आहे.
पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देताना त्यांनी राजीनामा पत्रात अत्यंत घणाघाती आरोप भाजप पक्षावर आणि स्थानिक पक्ष नेतृत्वावर केले आहे.
भाजप हा पक्ष मजबूत संघटनासाठी सर्वपरिचित आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भंडारा जिल्ह्यात भाजपाच्या दारुण पराभवानंतर स्थानिक पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आज जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार किंवा खासदार नाही. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व टिकवून ठेवण्यास भाजप सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे ही नगरपालिका निवडणूक भाजपसाठी केवळ प्रतिष्ठेचीच नाही तर वर्चस्वाची लढाई ठरली आहे.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विकास मदनकर, भाजप महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भूरे, भाजप महिला आघाडी माजी महामंत्री विजया नंदुरकर, जिल्हा महिला व्यापार आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चना श्रीवास्तव यांच्यासह अनेक निष्ठावंतांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकला. या सर्वांनी त्यांच्या राजीनामा पत्रात भाजप पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत.
अर्चना श्रीवास्तव यांनी भाजप हा “बिजनेस पक्ष” झाल्याचा आरोप केला होता तर कल्याणी भुरे यांनी “भाजपात महिलांना स्थान नाही” असा गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला होता. आत्मनिष्ठेने, प्रामाणिकपणे आणि पक्षाच्या तत्त्वांवर अखंड श्रद्धा ठेवून काम करणाऱ्यांची आता पक्षात किंमत नसून केवळ चापलुसी करणाऱ्यांना आणि व्यापारांना स्थान असल्याचे मदनकर यांनी म्हटले आहे.
सध्या उमेदवारी वाटपावरून भाजपमधील अनेक इच्छुक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. भाजपने उमेदवारी घोषित केलेले ३५ पैकी २१ उमेदवार इतर पक्षातून आलेले आहेत. त्यामुळे अनेकांनी विद्रोह करत आणि अत्यंत जड अंतकरणाने पक्षातून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला.
काल पक्षातील इच्छुक उमेदवार आणि इतर पक्षातून ‘उमेदवारीचे कमिटमेंट’ करून भाजपमध्ये पक्षप्रवेश दिलेल्यांना उमेदवारीपासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा होताच पक्षांतर्गत असंतोषाची लाट उसळली. नगरसेवकाची पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी जीवाचे रान केले होते मात्र ऐनवेळी त्यांना बगल देत अनुभव नसलेले आणि नऊ देतांना देखील उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप आता पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत आहेत.
दरम्यान, काल भाजपच्या माजी नगरसेविका तथा भाजप भंडारा शहर उपाध्यक्ष वंदना कुथे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. कुथे यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, “गेल्या २० वर्षापासून मी भाजपची सक्रीय सदस्य म्हणून काम करीत होती. पक्षाच्या अडचणीच्या दिवसात पक्षासाठी जीवावर ओतून काम केले आहे. या आधी नगर सेवक म्हणून प्रभाग ७ येथे व संपूर्ण जिल्ह्यात पक्षासाठी कार्य केले .
परंतु सध्या स्थितीत नगर सेवक असतांना सुद्धा पक्षाने केलेल्या सर्वे व निवडून येणाऱ्या संभावित उमेदवारामध्ये तुमचे नाव असल्याने तुमचे तिकीट पक्के आहे असे सांगून माझा विश्वास घात करून माझी तिकीट कापण्यात आले व ८ ते १० दिवसाआधी पक्षात आलेल्या नवख्या महिलेले जिला राजकारण व समाजकारणाचा गंध सुद्धा नाही अशा व्यक्तीला पक्षाचे तिकीट देण्यात आले. त्यामुळे मी अत्यंत दुखावले असून मला असहय्य वेदना होत आहेत.” या पत्रात त्यांनी पुढे पक्ष आणि पक्ष नेतृत्वावर खळबळजनक आरोप केले आहे त्यांनी म्हटले आहे की,
” भाजप पक्ष हा सध्या काँग्रेस पक्ष सारखा व्यक्तीनिष्ट पक्ष झाला आहे. भाजपमध्ये “देश प्रथम, नंतर पक्ष, नंतर मी”हे ब्रिद राहिलेले नाही. भाजप हा व्यापारी, सुपारी बाज व माफियांचा पक्ष झालेला आहे. पक्षासाठी दिवस रात्र काम करणाऱ्या २१ एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा तिकीटा बाहेरून आलेल्या आयाती नेत्यांनी एकाधिकारशाहीने तिकीट कापलेले आहेत. आयाती नेत्याने आपल्यासोबत आयात करून आणलेले २१ नवीन नवख्या आपल्या मर्जीतील धनाढ्य व माफिया लोकांना तिकीटा दिल्या आहेत. ही भाजपासाठी अत्यंत आत्मचिंतनाची बाब आहे. ज्यांना भाजपची तत्व व मूल्य माहित नाही, सामाजिक कार्य माहित नाही, राजकीय कार्य माहित नाहीत ते खरेच निवडणुकीनंतर भाजपशी एकनिष्ठ राहतील का या बाबत शंका आहे. पक्ष सोडतांना अत्यंत दुखः व वेदना अंतकरणात होत असून या आधी पक्षाने तिकीट देतानी कधीच तुमच्या कडील रक्कम व बँक बॅलन्स कधीच विचारला नव्हता पण या वेळी स्त्री उमेदवारांना अशा प्रकारचे प्रश्न विचारून लाडक्या बहिणी म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री साहेबांच्या आयाती नेत्याने पक्षातीलच लाडक्या बहिणींचा अपमान केला आहे हे स्पष्ट होते.
अशाच एकाधिकारशाही मुळे आज भंडारा जिल्ह्यात पक्षाचा खासदार व आमदारही नाही. आता नगर परिषदसुद्धा भाजपमुक्त होईल यात काही शंका नाही. भंडारा जिल्ह्यात भाजप यापुढे राहील किंवा नाही याबद्दल वाईट वाटत आहे. त्यामुळे मी भाजप पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा व पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा देत आहे.” असे वंदना कुथे यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक गोंडाने यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक जण नाराज
भंडाऱ्यात नगरसेवक पदाची उमेदवारी मिळावी यासाठी मागील अनेक वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले होते आणि मोर्चे बांधणी सुरू केली होती. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारण्यात आल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे इतर पक्षातून भाजपमध्ये उमेदवारी देऊ असे आश्वासन देऊन पक्षप्रवेश केलेल्यांना देखील ऐनवेळी उमेदवारी पासून दूर ठेवण्यात आले त्यामुळे त्यांचेही मनोबल खचले आहे.
