भंडारा : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकी मागची ‘साडेसाती’ अजूनही संपलेली नाही. एकीकडे निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच अगदी निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयाच्या एका आदेशाने खळबळ उडाली आहे. या निवडणुकीतील एक मतदार बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याने त्यावर आक्षेप घेत एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक होईल, मात्र पुढील आदेशापर्यंत निकाल जाहीर करण्यात येणार नाही, असा आदेश दिला . त्यामुळे आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक म्हणजे ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रणी ठरलेली भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक तब्बल ९ वर्षानंतर होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण १५३ उमेदवारांचे नामांकन वैध ठरले होते. त्यामधून १०७ जणांनी माघार घेतली. आता रिंगणात ४६ उमेदवार आहेत, एकूण १,०६२ मतदार असून, २१ संचालक पदासाठी ही निवडणूक होत आहे. भंडारा जिल्हा बँकेच्या २१ संचालकांच्या निवडीसाठी २७ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. २८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरू होऊन मतमोजणीनंतर लगेचच निवडणूक निकाल जाहीर केले जाणार होते. मात्र आता निवडणुकीचा निकाल गुलदस्ता राहणार आहे.
हरिचंद्र श्रीपत टेकम यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली. यात टेकाम यांनी एक मतदार बाहेरील जिल्ह्यातील असल्यावर आक्षेप घेतला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादीत कवडो दलसु बंटो हे एक मतदार आहेत. ते नूतन जंगल कामगार सहकारी संस्था सालेहेटी येथील असून भंडारा जिल्ह्यातील नाहीत. ययाचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी एक आदेश पारित केला.
आदेशात म्हटले आहे की, न्यायालयाच्या अंतरिम निर्देशांद्वारे निर्देश देण्यात आले की, कवडो दलसु बंटो यांना २७ जुलै रोजी होणाऱ्या निवडणूक वेळापत्रकात मतदान करण्याची परवानगी देण्यात आली, जरी तो अपात्र घोषित झाला असला तरी, त्याचे मत सीलबंद लिफाफ्यात वेगळे ठेवले जाईल. दरम्यान, निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार नाही. कवाडो यांना मतदान करण्याची परवानगी दिली, तर त्यांचे मत एका सीलबंद लिफाफ्यात वेगळे ठेवले जाईल आणि २७ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ज्या मतदारसंघांमध्ये त्यांना मतदान करण्याची परवानगी आहे त्या मतदारसंघांचा निकाल घोषित केला जाणार नाही. आता मतदान होणार असले तरी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून ७, इतर संस्था मतदारसंघातून ८, महिला प्रवर्गातून २, वैयक्तीक सभासद प्रवर्गातून १, इतर मागाल प्रवर्गातून १, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून १ आणि विशेष मागास प्रवर्गातून १ संचालक निवडले जातील. या निवडणुकीत, सर्व मतदारसंघातील एकूण १०६२ मतदार २१ संचालकांची निवड करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावतील.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रणी ठरलेली भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तब्बल ११३ वर्षांचा सुवर्णप्रवास पूर्ण करीत आहे. १९११ ला स्थापन झालेली ही बँक आजही ‘शेतकरी बँक’ म्हणून ओळखली जाते. आता तब्बल ९ वर्षांनंतर होणारी संचालक मंडळाची निवडणूक ही केवळ पदाधिकारी निवडीपुरती मर्यादित न राहता, संपूर्ण जिल्ह्याच्या सहकार राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सहकारात राजकारणाचा भंडारा कोण उडवणार हे पाहणे आता औत्सुकतेचे ठरणार आहे.
प्रमुख राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला..
जिल्हा बँकेच्या निवडणुक अगदी तोंडावर आली असून निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ही निवडणूक केवळ संचालकपदासाठी नसून जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्याच्या सहकार क्षेत्रात पीककर्ज वाटप व वसुलीत आघाडीवर असलेल्या या बँकेवर कोणता पक्ष ताबा मिळवतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.