भंडारा : व्यक्त होण्याचे वेगवेगळे मार्ग आणि पद्धती आहेत. रांगोळी हा सुद्धा असाच एक कला प्रकार आहे, ज्याद्वारे कलाकार आपल्या भावना व्यक्त करू शकतात. भंडाऱ्यात एका महिला रांगोळी कलाकाराने रांगोळीच्या माध्यमातून पहेलगाम येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या रांगोळीतून तिने तिच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

सध्या आतंकवाद्यांच्या भ्याड हल्यात मारल्या गेलेल्या निष्पाप पर्यटकांप्रती संवेदना व्यक्त करताना सारा देश हळहळत आहे. अशातच ज्या एका छायाचित्राने हृदय हेलावून सोडले होते, त्या नवविवाहीत जोडप्याला रांगोळीच्या माध्यमातून हुबेहूब रेखाटून भंडाऱ्याच्या एका कलावंताने वास्तवच जणूकाही मांडण्याचा प्रयत्न केला आहे.२२ एप्रिल रोजी पहेलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेला आतंकवादी हल्ला प्रचंड संतापजनक आणि चीड आणणारा होता. २६ जणांनी आपले प्राण या भ्याड़ हल्यात गमावले. त्यात नवविवाहत एका जोडप्यातील पतीचा समावेश होता. सैन्य अधिकारी असलेल्या या व्यक्तीचा जीव आतंकवाद्यांनी घेतल्यानंतर पतीच्या मृतदेहाजवळ बसून शोकमग्न असलेल्या जोडप्याचे छायाचित्र सर्वत्र सामाजीक झाले. हे दृश्य मनाला प्रचंड वेदनादेणारे होते.

हल्यानंतर संपूर्ण देश घटनेच्या निषेधासाठी रस्त्यावर उतरताना दिसत आहे. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने निषेध करीत असताना भंडारा गणेशपूर येथील चित्रा वैद्य यांनी हुबेहूब ते छायाचित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटून अनोखी श्रद्धांजली दिली आहे. चित्रा यांच्या कलेतून जाणवणाऱ्या त्या दाम्प्त्या प्रतीच्या संवेदना खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. कायम शुभ प्रसंगी रांगोळीच्या माध्यमातून वातावरण प्रसन्न ठेवणाऱ्या या कलेतून एखाद्याप्रती संवेदनाही तेवढ्याच हृदयातून व्यक्त केल्या जाऊ शकतात, हे चित्रा यांनी काढलेल्या रांगोळीला न्याहायल्यानंतर स्पष्ट होते. आज त्यांची ही रांगोळी चर्चेचा विषय ठरली आहे.