भंडारा : मागील ३ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील चांगला पाऊस बरसल्याने ३३ पैकी ३३ दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून ८०३० क्युमेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात शनिवारपासून पावसाने जोर धरला आहे. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी पावासाची रिपरिप सुरू आहे. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. पावसाने शहरांसह ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
आतापर्यंत ९ रस्ते बंद झाले असून तुमसर ते बालाघाट आंतरराज्यीय मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मासेमारांनी नदीमध्ये जाताना सतर्कता बाळगण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिला आहे.
रात्रभर धो धो बरसणाऱ्या पावसामुळे कारधा येथील वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. कारधा येथील ईशारा पातळी २४५ मीटर तर धोक्याची पातळी २४५.५० मीटर आहे. सद्याची पातळी २४४.९४ मीटर असून पाणी धोका पातळीच्या खाली आहे.
बंद रस्ते
भंडारा ते कारधा (लहान पुल)
तुमसर तालुका
▪️गोंदेखारी ते टेमनी
▪️चुल्हाड ते सुकळी नकुल
▪️कर्कापूर ते रेंगेपार
▪️कर्कापूर ते पांजरा
▪️तामसवाडी ते सीतेपार
तुमसर बपेरा आंतरराज्यीय मार्ग वाहतुकीसाठी बंद
सिहोरा तिरोडा संपर्क तुटला… सीलेगाव नाला ओसंडून वाहत आहे.
वैनगंगेने धोका पातळी ओलांडली …
कारधा पुल (जुना) येथे वैनगंगा नदीची ईशारा पातळी ही २४५ मीटर आणि धोका पातळी २४५.५० मीटर आज दि. ८ रोजी सकाळी ८ वाजता वैनगंगा नदीची (भंडारा) ईशारा गाठली असून व तसेच धापेवाडा धरणाचे विसर्ग पाहता धोका पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदी काठावरील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.