भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील ग्रामपंचायतीमध्ये आयोजित ग्रामसभेत ग्रामसभेतील विविध विषयांवर चर्चा सुरू असतानाच गावच्या सरपंचांनी ग्रामसभा संपली असे जाहीर करून काढता पाय घेतल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामसभेतच त्यांच्याविरुद्ध चांगलाच रोष व्यक्त केला आहे.

लाखनी तालुक्यातील पालांदूर ग्रामपंचायत येथे शुक्रवार रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामपंचायतमधील ग्रामस्थ सभेसाठी हजर होऊ लागले. गणपूर्ती झाल्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी प्रविण सोरटकर यांनी मागील वर्षीचे वृत्तांत वाचन करून शासकीय परिपत्रकाचे वाचन पूर्ण केले.यानंतर सभेपुढे आलेल्या अर्जांचे वाचन सुरू असताना महेश कोचे यांना पेट्रोल पंपाकरिता दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्र संबंधाच्या अनुषंगाने देणगी स्वरूपात दिलेल्या रकमेचा मुद्दा ग्रामसभेत उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी उचलून धरला. साहित्य खरेदीकरीता कोचे यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मागणीवरूनच ग्रामपंचायतीला साहित्य खरेदी करिता १५ हजार रुपयांची रक्कम दिल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे ही रक्कम ज्या दिवशी मिळाली त्या दिवशी लिपिक राधेश्याम पाथरे यांच्या म्हणन्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत अधिकारी प्रविण सोरटकर, लिपिक राधेश्याम पाथरे,सरपंच व त्यांचे पती उपस्थित होते. मात्र त्या दिवशी दिलेल्या रक्कमेची पावती न फाडता ती संपूर्ण रक्कम सरपंच पती यांच्याकडे दिली असल्याची कबुली खुद्द ग्रामपंचायत लिपिक राधेश्याम पाथरे यांनी भर ग्रामसभेत ग्रामस्थांना दिली.

विशेष म्हणजे कोचे यांनी जुन २०२४ ला ही रक्कम ग्रामपंचायतच्या लिपीकाकडे सुपूर्द केली होती. यावेळी रकमेची पावती संबंधिताला देणे आवश्यक असताना ती दिल्या गेली नसल्याने काही ग्रामपंचायत सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. याची कुणकुण ग्रामस्थांना लागली असल्याचे समजताच आपले बिंग फुटले याची माहिती झाल्यामुळे सरपंच पती यांनी ती संपूर्ण १५ हजार रुपयांची रक्कम तोमेश घावडे यांच्या मार्फत ग्रामपंचायत लिपिकाकडे सपूर्द केली असल्याचे घावडे याने कबूल केले.

एकंदरीत १५ हजार रुपयांच्या रकमेने जुन २०२४ ते एप्रिल २०२५ असा तब्बल दहा महिन्याचा प्रवास केल्यानंतर ग्रामपंचायतीकडून सामान्य फंडाची पावती फाडण्यात आली. या संपूर्ण प्रकाराचा इतिवृत्तांत भर ग्रामसभेत लिपिकाने सांगताच ग्रामसभेत उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी सरपंचा विरोधात रोष व्यक्त केला. त्यामुळे ग्रामसभेत काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

यानंतर जुन २०२४ ला ग्रामपंचायतीला उपलब्ध झालेल्या १५ हजार रुपयांच्या रक्कमेने तब्बल दहा महिने प्रवास करून अखेर पुस्तक क्र.१ पावती क्र.२१ नुसार १६ एप्रिल २०२५ ला सामान्य पावती देणगी स्वरुपात फाडण्यात आली. लगेच पावती न देता दहा महिन्यापर्यंत पावती का दिली गेली नाही?या विषयावर ग्रामसभेच्या अध्यक्ष यांना ग्रामस्थांनी वेळोवेळी विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच ग्रामस्थांच्या मागण्या मंजूर करणे गरजेचे असतानाच व ग्रामस्थांच्या आलेल्या अर्जांवर उत्तरे न देताच विषय अर्धवट ठेऊन सभेचे अध्यक्ष ह्या ग्रामसभेतून निघून गेल्या असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ग्रामसभेतून खुद्द सरपंचांनीच ग्रामसभा अर्धवट ठेवून पलायन केल्याने सरपंचच अध्यक्षस्थानी नसल्यामूळे ग्रामपंचायत अधिकारी यांनी सरपंचांच्या म्हणण्यानुसार ग्रामसभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे ग्रामसभेला ग्रामस्थांनाच किंमत नसल्याने ग्रामसभेला यायचे कशासाठी?अशी नाराजी व्यक्त करून ग्रामस्थ देखील एक एक करत निघून गेले.

शासनाच्या आदेशाला केराची टोपली

सरपंच हा गावाचा प्रथम नागरीक असल्याने त्यांचा वेगळाच रुबाब,सन्मान असतो. मात्र,महिला सरपंच असल्यास कामकाजामध्ये बर्‍याचदा त्यांचा पतीचा अथवा इतर नातेवाइकांचा हस्तक्षेप कायम असतो.पदाधिकार्‍यांच्या कार्यालयांमध्ये नातेवाईकांनी मुळीच बसता कामा नये,असेही सरकारी आदेशात नमूद आहे. परंतु,लाखनी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे ग्रामस्थ,ग्रा.पं.सदस्य राजकीय दबावापोटी दबक्या आवाजात बोलत आहेत.यावर शासन निर्णयानुसार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. मी १ तास ग्रामसभेत होती. एकाच मुद्द्यावर एक एक तास चर्चा केली जाते. तेवढा वेळ थांबणे शक्य नाही. त्यामुळे विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर मी आभारप्रदर्शन करून सभेतून बाहेर पडली.

लता कापसे, सरपंच, पालांदूर

२३ मे रोजी ग्रामसभेच्या अनुषंगाने शासकीय..

परिपत्रकाचे वाचन झाल्यानंतर ग्रामसभेत आलेले अर्जांचे वाचन सुरू असताना पेट्रोल पंपाच्या ना हरकत प्रमाणपत्राकरिता १५ हजार रूपयांविषयी ग्रामस्थांनी विचारणा केली असता अध्यक्ष महोदयांनी ग्रामसभा संपली असेल जाहीर केले.त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामसभा संपविण्यात आली.

प्रवीण सोरटकर, ग्रामपंचायत अधिकारी, पालांदूर.

ग्रामसभा ही ग्रामपंचायतीच्या सर्व मतदारांची सभा आहे.यात ग्रामसभेच्या अध्यक्षांना माहिती विचारता येते व सूचनाही करता येतात. ग्रामस्थांच्या एखाद्या प्रश्नांचे उत्तर देण्यास ग्रामसभेचे अध्यक्ष असमर्थ असतील तर त्यांनी अशा तऱ्हेने भर सभेतून काढता पाय घेणे व संबंधित विषयांवर चर्चा व ठराव होण्याअगोदरच ग्रामसभा संपली असे जाहीर करणे योग्य नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंकज रामटेके, उपसरपंच, ग्रामपंचायत पालांदूर.