भंडारा : विधानसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा राजकीय वातावरण तापले ते जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने. नेत्यांच्या आर्थिक सत्तेचे केंद्र म्हटले जाणाऱ्या भंडारा दूध संघाची निवडणूक आता लक्षवेधी ठरली आहे.सहकारातील या निवडणुकीत पहिल्यांदाच दिग्गजांनी उडी घेत विचित्र युती केली आहे. दूध संघातील काँग्रेसची सत्ता हटवण्यासाठी महायुती ताकद पणाला लावत आहे.
येत्या २८ जून रोजी जिल्हा दूध संघाची निवडणूक पार पडणार आहे. २५ कोटींची उलाढाल आणि ३०० हून अधिक दूध संस्था असलेल्या तसेच रोज ४० हजार लिटर दूध विक्री करणाऱ्या दूध संघावर आता राज्यातल्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक तसेच गावपातळीपर्यंतचे राजकारण दूध संघामुळे हातात ठेवता येत असल्याने राजकीय नेत्यांना फायदेशीर ठरते.
दूध संघात सत्तांतर करण्यासाठी आमदार नाना पटोले आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी हातमिळवणी केली. महायुतीत असताना आमदार भोंडेकर यांनी काँग्रेसच्या नानांचा हात पकडणे भाजपच्या परिणय फुके यांच्या जिव्हारी लागले. फुके आणि सुनील फुंडे यांनी देखील नाना आणि भोंडेकर यांच्याविरोधात रणशिंग फुंकले. जिल्ह्याच्या राजकारणाला सहकाराची जोड असल्याने दोन्ही बाजूच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
राज्यात सत्ता कोणत्याही पक्षाची असली तरी स्थानिक सहकाराच्या राजकारणात मात्र, मातब्बर नेते एकाच आघाडीत पाहायला मिळायचे. मात्र, यंदा दूध संघाच्या निवडणुकीत थेट पक्षीय राजकारण शिरल्याने आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. दूध संघ ताब्यात घेण्याच्या हालचाली महायुतीने सुरू केल्याआहेत. मात्र महायुतीतील शिंदे सेनेचे आमदार भोंडेकर यांनी वेगळी भूमिका घेतली.
ते काँग्रेसच्या पटोले यांच्या हाताला लागले असून त्यांनी महायुतीच्या भाजप राष्ट्रवादीच्या परिणय फुके – फुंडे यांच्या विरोधात थेट बंड केले आहे. दरम्यान, २८ जूनला होवू घातलेल्या दूध संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप- राष्ट्रवादी समर्थित सहकार विकास पॅनल व काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनलनेही प्रचाराला सुरुवात केली आहे. दूध संघाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पटोले विरुध्द फुके असे दंद्व रंगणार आहे. विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसचे आणि भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शरद इटवले यांच्या नेतृत्वातील पॅनल रिंगणात आहे. १२ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणार आहेत.
लाखनीत तिरंगी लढत
भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहा गटांमधून १२ संचालक निवडून द्यायचे आहेत. सामान्य प्रतिनिधी गटातून प्रत्येक तालुक्यातून एक संचालक असे ७ संचालक निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी सामान्य प्रतिनिधी गटातील लाखनी वगळता सर्व ठिकाणी एकास एक अशी थेट लढत होणार आहे. फक्त लाखनीमध्ये तीन उमेदवार असल्याने येथे तिरंगी लढत होत आहे. या तिरंगी लढतीचा लाभ कसा घ्यायचा, याची आकडेमोड सध्या नेतेमंडळी करत आहेत.
१६९ मतदार बजावणार हक्क
दूध संघाची उलाढाल मोठी असली तरी मतदार मात्र फक्त १६९ आहेत. यामध्ये लाखनी तालुक्यात २८, साकोलीत १७, लाखांदूरात १५, मोहाडीत २७, तुमसरमध्ये १३, पवनीत १९ तर भंडारा तालुक्यात ४९ मतदार आहेत. त्यामुळे प्रत्येकच मतदारापर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न सर्वांकडूनच होत आहे. दोन गटात थेट लढत होत आहे. भाजप, शिवसेना व काँग्रेसमधील दिग्गज या निवडणुकीत उतरले आहेत. यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे.