भंडारा : अनेक ठिकाणी झालेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या किंवा पुलाच्या कामांची पोलखोल पावसाळ्यात होत आहे. पाहिल्याच पावसात अनेक ठिकाणी रस्ते किंवा पूल वाहून गेल्याच्या घटना घडत आहे. भंडाऱ्यात सुद्धा अशीच एक घटना समोर आली आहे. भोजपूर येथील रस्त्यावरील पूल आज सकाळी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

एम्प्रेस सिटीकडे जाणारा भोजपुर कॅनल मार्गावरील व्यंकटेश नगर फेज १ ही नवीन कॉलनी खात मार्गावर बांधण्यात आली. साधारण जानेवारी महिन्यात बांधकाम करण्यात आलेला या रस्त्यावरील पूल आज वाहून गेला.

दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. या पुलाच्या जवळच असलेल्या नाल्यातील पाणी सुद्धा ओसंडून वाहत आहे. या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्यावरील निकृष्ट बांधकाम केलेला पूल खचला आणि प्रवाहात वाहत गेला. पूल वाहून गेल्यामुळे रस्त्याचे दोन भागात विभाजन झाले आहे. पाण्याच्या प्रवाहात रस्ताही वाहून जातो का अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.ही वस्ती नवीन असल्याने या ठिकाणी काहीच घरे आहेत त्यामुळे या मार्गावरून वर्दळ कमी होती. सकाळी साडे आठ वाजता दरम्यान ही घटना घडली.

या पुलाचे बांधकाम करताना लोखंड वापरण्यात आलेला नाही. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करणात आले आहे. ले आऊट करताना मनमानी कारभार करून अशा प्रकारे काम करण्यात आले असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. मात्र नगर रचनाकार काय बघून अशा बांधकामांना परवानगी देतात असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.