भंडारा : दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत आहे. कालपासून तर पावसाने जोर धरला असून मुसळधार सुरू आहे. सर्वत्र नदी नाले ओसंडून वाहत आहेत, अनेक मार्गही बंद पडले आहे. अनेक रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. असे असताना अतिवृष्टीसदृश्य पावसातही जिल्ह्यातील शाळाना सुट्टी देण्यात आलेली नाही. संभाव्य धोका लक्षात घेता सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करायला हवी होती मात्र सुट्टी न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी जीव मुठीत धरून शाळेची वाट धरली आहे.

सध्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरवेळी प्रमाणे जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन आणि शिक्षणाधिकारी यांचेकडून शाळा बंदचे पत्र न येता यावर्षी शाळांना स्थानिक स्तरावर परिस्थिती पाहून मुख्याध्यापकांना शाळेला सुटी जाहीर करण्याचे अधिकारी दिले आहेत. असे असताना शहरातील एकही मोठ्या शाळेने अजून पर्यंत त्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन सुट्टी जाहीर केलेली नाही. पोद्दार, सेंट पीटर्स, स्प्रिंग डेल स्कूल, नूतन कन्या शाळा, गांधी शाळा, सनफ्लॅग शाळा अशा अनेक शाळा आज सुरू आहेत. या मोठ्या शाळांमध्ये ग्रामीण भागातून शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी बसने, ऑटोने किंवा सायकलने शिकायला येतात आणि सुटीची सूचना नसल्याने जीव मुठीत धरून आज ते शाळेला आले आहेत.

दरम्यान, काही शाळांमध्ये १० ते २० टक्के उपस्थिती आहे. मात्र काही ठिकाणी शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला आल्या नाहीत अशा स्थितीत दिवसभर विद्यार्थ्यांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. स्पष्ट सूचना नसल्याने मुख्याध्यापक आपल्या स्तरावरून निर्णय घेत नाहीत असे सांगण्यात येत आहे.

शाळा व्यवस्थापन समितीला अधिकार दिले असले तरीही त्यांनी सुटी जाहीर केली नाही. काही विद्यार्थी शाळेत आले मात्र काही ठिकाणी शिक्षक आणि मुख्याध्यापकच शाळेत गैरहजर असल्याचे वृत्त आहे.

जबाबदारी कोणाची?

वास्तविक जिल्हाधिकारी यांनीच नेहमीप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाद्वारे पत्र निर्गमित करायला हवे होते. पण त्यांनी ही जबाबदारी शिक्षणाधिकारी यांचेवर टाकली, शिक्षणाधिकारी यांनी गट शिक्षणाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समिती यांचेवर जबाबदारी ढकलली. शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव मुख्याध्यापक असतात. मुख्याध्यापकांनी निर्णय न घेतल्याने सगळी तारांबळ उडाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकांमध्ये नाराजी..

रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाने अजूनही उसंत घेतली नाही. असे असताना शाळांना सुट्ट्या जाहीर न केल्यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची आज पावसात पुरती त्रेधातिरपीट झाल्याचे पहावयास मिळाले. धोधो पाऊस सकाळपासूनच येत असल्याने पालक सकाळी मुलांना छत्रीचा आधार घेत शाळेत सोडत होते. प्रत्यक्षात पावसामुळे झालेल्या पालकांच्या धावपळीमुळे त्यांनी हवामान खाते व जिल्हा प्रशासनावर आणि शाळांवर देखील नाराजी व्यक्त केली.