भंडारा : चंद्रावर जाण्यासाठी मार्ग आम्ही शोधून घेऊ मात्र शिक्षणासाठी शाळेत जाण्याचा मार्ग आम्ही कसा शोधायचा असा प्रश्न उपस्थित करत शाळेपर्यंत रस्त्याच्या मागणीसाठी चक्क विद्यार्थीच उपोषणाला बसल्याचा प्रकार लाखांदूर तालुक्यात समोर आला आहे.
टोलीपासून शाळेपर्यंत जाणाऱ्या मार्गावर पावसाळ्यात गुडघाभर पाणी राहत असल्याने या टोलीवर वास्तव्य करणाऱ्या १३ कुटुंबातील लोकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून शाळेसाठी मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे शाळेपर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता तात्काळ मंजूर करण्याची मागणी शिवसेना उबाठा गटाचे लाखांदूर तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी केली आहे. या मार्गाने पाण्यातून पायपीट करणाऱ्या हेटीवरील चिमुकल्या ७ विद्यार्थ्यांसह आमरण उपोषणाला बसले आहेत.
लाखांदूर तालुक्यातील सरांडी/बूज येथील टोलीवर जवळपास १३ कुटुंब मागील ७० वर्षापासून वास्तव्यास आहेत. वस्तीतील ८ चिमुकले विद्यार्थी येथीलच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र टोलीपासून शाळेपर्यंतचा मार्ग पावसाळ्यात जीवघेणा ठरत असून या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊ शाळेसाठी मार्गक्रमण करावे लागते. पावसाळ्यात या मार्गावर गुडघाभर तर अतिवृष्टीच्या वेळी अक्षरशः कंबरेपर्यंत पाणी असते. अशा प्रतिकूल परिस्थितीत या पालक आपल्या पाल्यांना शाळेत सोडून देतात. पावसाळा व्यतिरिक्तही या मार्गावर गुडघाभर पाणी साचून राहत असल्याने हे चिमुकले विद्यार्थी एकमेकांचा हाथ पकडून एकमेकांच्या सहाय्याने गुडघाभर पाण्यातून जीवघेणा प्रवास करतात.
पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदला या संदर्भात वारंवार सूचना आणि पत्रव्यवहार करूनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. १३ ऑगस्ट रोजी लाखांदूर गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदचे अभियंता येथील परिस्थितीचा आढावा घेवून गेले मात्र पुढे काहीही झाले नाही. एखादा अनुचित प्रकार घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न या विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे.
टोलीपासून शाळेबद्दल जाण्यासाठी सिमेंट काँक्रिट च्या रस्त्याला मंजुरी देण्याची मागणी शिवसेना उबाठा गटाचे लाखांदूर तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी २० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली होती. मात्र त्या निवेदनाची दखल न घेतली गेली नसल्याने अखेर विनोद ढोरे हे आज २८ ऑगस्ट रोजी सारांडी/बू येथील शिवाजी चौक परिसरात ७ चिमुकल्या विद्यार्थ्यांसह आमरण उपोषणाला बसले.
सुंदर ग्राम निर्मिती आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न धुळीस मिळत आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना जर जीव मुठीत ठेवून गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागत असेल आणि तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प बसतात ही शोकांतिका आहे. – विनोद ढोरे, लाखांदूर तालुकाध्यक्ष, शिवसेना (उबाठा)