भंडारा : धान खरेदीसाठी बाजार समितीकडे जाणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात व्यापाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार काही अंतरापर्यंत फेकला गेला. यानंतर ट्रकखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर मार्गावर गर्दी जमली.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर- गोबरवाही मार्गावरील टुमनी नाल्याजवळ हा भीषण अपघात घडला. मागेहून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात परसवाडा (दे.) येथील व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात घडल्यानंतर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी प्रविण खवास ( ३५) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मृत प्रविण खवास हे दुचाकीने तुमसरहून गोबरवाहीकडे धान्य खरेदी करीता जात होते. याच दरम्यान टुमनी नाल्याजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आल्याने प्रवीण खवास यांचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यानंतर प्रवीण दुचाकीसह काही अंतरापर्यंत फेकला गेला. यानंतर ट्रकखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर मार्गावर गर्दी जमली होती. यामुळे या मार्गावरील वाहतूक देखील काही काळासाठी ठप्प झाली होती. प्रविणच्या मृत्यू नंतर बाजार समितीतील सहकार्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे.
ट्रक चालक झाला फरार
अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह रुग्णालयात नेट खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान फरार ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.