नागपूर: सेमिनरी हिल्सवरील नागपूर वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात बरेच पक्षी उपचारासाठी येत असतात. त्यांच्यावर उपचार करून बरे झाल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येते. मात्र, आता या पक्ष्यांच्या पुढील प्रवासाचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी नागपूर वनविभाग व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे यांनी या करारावर सह्या केल्या. पक्षी उपचारानंतर निसर्गात मुक्त केले तरी त्यांचा पुढील प्रवासाची माहिती नसते. मात्र, त्यांना रिंग लावली, त्यांची वैज्ञानिक माहिती ठेवली, त्यावर संशोधन केले तर ते वनखात्यासाठीही उपयोगी ठरणारे आहे. याच उद्देशाने हा करार करण्यात आला. यामुळे ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना या सर्व गोष्टीचे प्रशिक्षण देण्यात येईल. हेही वाचा. वाशिम: ‘स्ट्रीट लाईट’च्या प्रकाशाने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात; शेतकरी अनोख्या संकटात अलीकडेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या मदतीने ब्लॅक ईगल व गिधाडांना रिंग लावून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. याप्रसंगी कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.