वर्धा : राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता पक्षीय पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. संघटना सर्वप्रथम या तत्वावर चालणाऱ्या भाजपमध्ये मात्र पूर्वीच बैठका आटोपल्या होत्या. प्रदेश प्रतिनिधिने संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती आटोपल्या. नावे मात्र गुलदस्त्यात आहे. आता पुढील टप्पा सूरू होणार. मावळत्या पालिका सत्तेत सहाही ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष राहून चुकले. परिणामी आता हेच यश कायम राखण्याचे मोठे आव्हान राहणार. त्याची प्रमुख जबाबदारी पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांच्यावर तसेच आमदारांवर येऊन पडली आहे. जिल्ह्यातील चारही आमदार भाजपचे व सोबत एक विधान परिषदेचा आमदार. त्यामुळे अपेक्षित रिझल्ट द्यावाच लागणार, असा दबाव आहेच. तूर्तास प्रदेश प्रतिनिधीने मुलाखती आटोपल्यानंतर आता जिल्हयंतर्गत मुलाखती सूरू झाल्या आहेत.
आर्वी व हिंगणघाट आटोपले. आज उर्वरित वर्धा, देवळी, पुलगाव व सिंदी येथील मुलाखती होणार. वर्ध्यात आमदार सुमित वानखेडे, पुलगावात माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, सिंदीत आमदार राजेश बकाने तर देवळीत अविनाश देव हे नगराध्यक्ष पदास ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार. आमदार कुणावार यांनी आर्वीत तर माजी खासदार रामदास तडस यांनी हिंगणघाटला मुलाखती घेतल्या. इच्चूकांची भाऊगर्दी असल्याचे चित्र उमटले. ८ तारखेस वर्ध्यात परत जिल्हा कोअर कमिटी चर्चा करणार. या दिवशी प्रत्येक पालिकेतील इच्छुकांना एक तास देत मत जाणून घेतल्या जाणार आहे. प्रदेश प्रतिनिधीने घेतलेल्या मुलाखतीत कुठेही एकाच नावावर संमती दिसून आली नव्हती. म्हणून आता ८ ते १२ नोव्हेंबर दरम्यान नावाबाबत घमासान होणार. १३ तारखेस प्रत्येक पालिकेत तीन नावांचे पॅनल तयार करीत ते मुंबईस प्रदेश समितीकडे पाठविल्या जाणार आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे मुंबईतूनच जाहीर होतील. १४ नोव्हेंबरला त्या नावांची घोषणा होणार. कारण १५ पासून अर्ज दाखल करणे सूरू होत आहे. १४ नोव्हेंबर रोजी बहुतांश घोषित होतील पण वाद असलेल्या ठिकाणी एक दोन दिवस उशीर होवू शकतो, असे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी नमूद केले. ते म्हणतात की स्थानिक पातळीवार केवळ ईच्छुक नगरसेवक यांची नावे जाहीर करण्याचा अधिकार आहे.
निवड करणाऱ्या कोअर समितीत सर्व आमदार, आजी माजी जिल्हाध्यक्ष, माजी खासदार, चार जिल्हा सरचिटणीस, अविनाश देव व गुंडू कावळे यांचा समावेश आहे. हा संघटनात्मक भाग असला तरी शब्द पालकमंत्री व आमदार यांचाच चालणार. कारण विजय मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. संघटना पदाधिकारी मत व्यक्त करतील. आमदाराच्या मर्जी विरोधात उमेदवार लादल्यास त्याची जबाबदारी घेणार कोण ? असा कळीचा मुद्दा आहे. तसेच फायनल से अर्थात पालकमंत्री डॉ. भोयर यांचा राहू शकतो. प्रदेशने निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार रामदास तडस व प्रभारी म्हणून पालकमंत्र्यांना नेमले आहे. स्थानिक पातळीवार आतापर्यंत झालेल्या चर्चेत कोणाशीच म्हणजे राष्ट्रवादी व सेना यांच्याशी युती नं करण्याचा आग्रह झाला आहे. जिल्ह्यात हे दोन्ही मित्र नावापुरतेच असल्याने भाजपचा टक्का कमी करण्याचे कारण नसल्याचा सूर प्रकटला. अस्तित्व असल्यास प्रभागात या मित्र पक्षाचे उमेदवार सामावून घेण्याचा समंजसपणा दाखवू, अशी टिपणी कोअर ग्रुपच्या एका नेत्याने केली. प्रामुख्याने नवे व स्वच्छ चेहरे देण्याचा प्रयत्न राहील, असे मत जिल्हाध्यक्ष गाते व्यक्त करतात.
