भंडारा : भंडारा-गोंदियात लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असावा, याची चाचपणी करण्यासाठी भाजपकडून लोकसभा निरीक्षक म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि आमदार प्रवीण दटके यांची नेमणूक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दोन्ही निरीक्षकांनी गुरुवारी (२९ फेब्रुवारी) लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीसंदर्भात आजी-माजी खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. त्यात दिवसभरात भाजपचे प्रमुख पदाधिकारी, तसेच वेगवेगळ्या मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानुसार हे निरीक्षक आपला गोपनीय अहवाल प्रदेश भाजपला सादर करणार असल्याची माहिती भाजपच्या नेतेमंडळींकडून दिली गेली आहे.

हेही वाचा…अशोक चव्हाण यांना श्रद्धांजली? काँग्रेस कार्यालयात धक्कादायक…

भंडारा- गोंदियात मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने नवख्या उमेदवाराला तिकिट देत मोदी लाटेत गड सर केला. सन २०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी भाजपमधून लढण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे पक्षाची ही एक प्रक्रिया असली, तरी अंतिम निर्णय दिल्लीतच होणार असल्याने भंडारा- गोंदियाची भाजपच्या तिकिटाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपकडून विद्यमान खासदार सुनिल मेंढे, माजी आमदार डॉ.परिणय फुके, भाजप नेते संजय कुंभलकर, माजी खासदार शिशूपाल पटले, भाजप नेते हेमंत पटले, ब्रम्हानंद करंजेकर, विजय शिवणकर यांच्यासह आणखी काही इच्छुकांसह अनेकांनी नावे चर्चेत असून, त्यांच्याकडून उमेदवारीची दावेदारी केली जात आहे. विशेष म्हणजे इच्छुकांकडून पदाधिकाऱ्यांना माझ्या नावाची शिफारश करा म्हणून आदल्या दिवशी फोनाफानी झाल्याच्या चर्चेलाही जिल्ह्यात उधाण आले आहे.

हेही वाचा…पोलीस महासंचालक संघ मुख्यालयात, काय आहे कारण…

गटातटात लॉटरी कोणाला लागणार ?

दोन्ही प्रदेश निरीक्षकांनी प्रामुख्याने आजी-माजी आमदार, खासदार, तसेच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. भंडारा – गोंदिया जिल्ह्यात मागील पाच वर्षात भाजपमध्ये खासदार सुनील मेंढे, माजी आमदार परिणय फुके व या दोघांनाही विरोध करणारा निष्ठावंत असे गट पडलेले आहेत. प्रत्येक गटाकडून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्नही केला जात होता. त्याचे पडसाद निरीक्षकांनी घेतलेल्या वैयक्तिक भेटीत उमटले असून, केवळ अर्ध्या एक मिनिटात कोणता उमेदवार असावा, असा प्रश्न विचारण्यात आला. या वेळी प्रत्येक गटाच्या कार्यकर्त्यांनी हवे असलेले नाव सांगितल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या गटातटाच्या राजकारणात भंडारा – गोंदिया लोकसभेच्या उमेदवारीची लॉटरी कोणाला लागणार, हे निश्चित होणार आहे. २०१९ च्या लोकसभेसाठी भाजपकडून भंडारा नगरपरिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्यासह अनेकजण इच्छुक होते. त्या वेळी जिल्ह्यातील गटतटाच्या राजकारणातून थेट दिल्लीपर्यंत तिकिटासाठी जोर लावण्यात आला होता. त्यात मेंढे यांना तिकिटाची लॉटरी लागली होती.

हेही वाचा…नवीन कायद्यानुसार नागपुरात पहिल्या ‘सरोगेट मदर’ प्रकरणास मंजुरी

जिल्ह्या बाहेरचा उमेदवार नको !!

भंडारा- गोंदिया लोकसभा निवडणूकीसाठी भाजपचा उमेदवार बाहेरचे पार्सल नको, असा सूर दोन्ही जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आवळल्याची विश्वसनीय माहिती आहे. जर चंद्रपूर लोकसभेची तिकिट कुणबी समाजाच्या उमेदवाराला झाली तर भंडारा- गोंदियाची उमेदवारी तेली समाजाच्या व्यक्तीला दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, पाच वर्षातील विद्यमान खासदार यांच्या कार्यप्रणालीवर व माजी राज्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात दोन्ही जिल्ह्यात वाढीस घातलेल्या गटातटाच्या राजकारणामुळे दोघांचाही पत्ता कट असल्याची चर्चा रंगू लागली आहे. सुरुवातीला भाजप मध्ये नेते लहान व संघटना मोठी होती, आता या उलट नेते मोठे व संघटना लहान झाले असल्याची खंत भाजपच्या जुन्या नेतेमंडळींकडून व्यक्त केली जात असून बाहेरचा उमेदवार जिल्ह्यावर लादू नये असेही अप्रत्यक्षपणे निरीक्षकांना सांगितले असल्याचे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर जिल्हा भाजप नेत्याने सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp appoints observers to assess lok sabha candidate for bhandara gondia constituency ksn 82 psg