सत्ताधारी-विरोधकांचा आयुक्तांवर एकत्र प्रहार; मनमानी कारभाराविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचा इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : माझ्यामुळे करोना रुग्णाचे प्रमाण कमी झाले असा महापालिका आयुक्तांचा होरा असेल तर ते चुकीचे आहे. असा चमत्कार करायाला ते काही देव नाहीत, अशा शब्दात सत्ताधारी-विरोधकांनी महापालिका आयुक्त तुकाराम  मुंढे यांच्यावर प्रहार केला. मुंढे यांच्या मनमानी कारभाराबाबत माहिती देण्यासाठी महापालिकेचे सत्ता पक्षनेते संदीप जाधव व विरोधी पक्षाचे नेते तानाजी वनवे  यांनी आज गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

यावेळी तानाजी वनवे म्हणाले, शहरातील करोनाचे कमी प्रमाण हे डॉक्टर, पोलीस विभाग आणि महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे हे सांघिक यश आहे. करोना संदर्भात मुंढे लोकप्रतिनिधीना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने एकतर्फी निर्णय घेत आहेत. त्यांची जर अशीच भूमिका कायम राहिली तर त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणू. महापालिकेत केवळ एकतर्फी कारभार सुरू  आहे.

नगरसेवकांनी मांडलेल्या समस्या सुद्धा ऐकून घेतल्या जात नाही. शहरातील आठही विलगीकरण केंद्रात अनेक समस्या आहेत.  तेथील लोक त्या संबंधित नगरसेवकाकडे मांडत असतात. मात्र आयुक्त ते

ऐकून घेत नाही. आता तर नगरसेवकांवरच गुन्हे दाखल केले जात आहेत. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी प्रवीण गंटावार  हिटलरशाही पद्धतीने नगरसेवकांशी वागतात. त्याचा आम्ही निषेध करतो, असेही वनवे म्हणाले.

नियम मी बनवले नाहीत –  मुंढे

जेथे जेथे करोनाग्रस्त आढळतात  तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. यासंदर्भात नियम महापालिका आयुक्त म्हणून मी बनवले नाहीत. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्याच त्या मार्गदर्शक सूचना आहेत. नागरिकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेसाठी हा नियम असून कुठल्याही भूलथापांना नागरिकांनी बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मुंढे  म्हणतात, आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, अखेरचा रुग्ण नकारात्मक आल्यापासून पुढील २८ दिवस संबंधित क्षेत्र  प्रतिबंधित राहील. यामागे वैज्ञानिक आणि वैद्यकीय कारण आहे. २८ दिवसाला १४ आणि १४ अशा दोन भागात  विभागण्यात आले आहे.

नगरसेवक साठवणे विरोधात गुन्हा

सतरंजीपुरा परिसरातील नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी विलगीकरण केंद्रात जात असताना रोखण्यात आले. मुंढे यांनी माझ्या विरोधात लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल केला, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे यांनी केला. मी लोकांच्या समस्या मांडण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावर यांच्याशी चर्चा केली. लोकांना सक्तीने विलगीकरणात  घेऊन जात होते. अनेकांच्या घरी समस्या होत्या तर काही आजारी होते. त्यामुळे डॉ. गंटावर यांना लोकांवर बळजबरी करू नका, अशी विनंत्ांी केली. मात्र त्यांनी माझ्यावरच गुन्हा दाखल केल्याचे साठवणे म्हणाले.

..तर जनतेसोबत रस्त्यावर उतरू

सत्तापक्ष नेते संदीप जाधव म्हणाले, विलगीकरण केंद्रात नागरिकांना जेवण मिळत नाही.  कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळत नाही.  महापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह वरिष्ठ नगरसेवकांना सुद्धा कुठल्याही निर्णयाबाबत विचारले जात नाही. आयुक्तांचा दुराग्रहीपणा असाच कायम राहिला तर सर्वपक्षीय नगरसेवक मिळून  त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणू. त्यानंतरही जर सरकारने त्यांना परत बोलावले नाही तर प्रसंगी जनतेला सोबत  येऊन रस्त्यावर उतरू, अशा इशारा त्यांनी दिला.

नाले सफाईबाबत महापौरांची नाराजी 

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर  नागनदीसह पोरा, पिवळी नदी आणि नाल्यांची सफाई केली जाते. आयुक्तांच्या निर्देशानुसार यावर्षी काम वेळेआधी सुरू करण्यात आले असले तरी अद्याप काम पूर्ण झाले नाही, असे सांगत महापौर संदीप जोशी यांनी नाले सफाईच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. कामाचा वेग वाढवत पुढील सात दिवसांत सफाई पूर्ण करण्यात यावी, अन्यथा पावसाळ्यात पूर परिस्थिती उद्?भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा महापौरांनी दिला. नदी स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

‘त्या’ शाळांना नोटीस द्या

सेंट झेव्हिअर्स आणि सेंट पॉल शाळा नदीलगत आहे. मुख्य रस्त्यापासून शाळेत जाण्यास अद्यापही योग्य सोय नाही. शाळांचा आजूबाजूचा परिसर सखल असल्यामुळे तेथे पाणी साचते. बऱ्याचदा अग्निशमन विभागाच्या सहकार्याने शाळेतून मुलांना बाहेर काढावे लागते. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही शाळांची जबाबदारी आहे. त्यामुळे या  शाळांना नोटीस द्या, असे निर्देश महापौरांनी दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp congress corporators in nagpur municipal corporation attack on tukaram mundhe zws
First published on: 29-05-2020 at 01:42 IST