चंद्रपूर : भाजपात अंतर्गत गटबाजीमुळे तब्बल ३० वर्षानंतर ग्रामीण आणि महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी अभिप्राय नोंदविण्याची वेळ पक्षावर आली आहे. आज पक्ष निरीक्षकासमक्ष ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी ३९ तर महानगर अध्यक्ष पदासाठी २४ मतदार असलेल्या आजी माजी आमदार व पदाधिकारी यांचे अभिप्राय नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील भाजपचे सर्वच आमदार अभिप्राय नोंदविण्यात सक्रिय होते. दरम्यान सात सदस्यीय प्रदेश कोअर समितीत चर्चा झाल्यानंतर साधारणतः २ मे नंतर ग्रामीण व महानगर अध्यक्षांची नाव घोषित केली जाणार आहेत.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर या जिल्ह्यात भाजपात अंतर्गत दुफळी, वाद, भांडणे विकोपाली गेली आहेत. एकीकडे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे तर दुसरीकडे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, आमदार बंटी भांगडीया व माजी मंत्री तथा मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभा फडणवीस आहेत. मंडळ अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत वाद उदभवला होता. त्यामुळे मंडळ अध्यक्षासाठी दुसऱ्यांदा अभिप्राय नोंदविण्यात आले. त्यानंतर आज मंगळवारी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात पर्यवेक्षक आमदार अनिल सोले. ग्रामीणचे निरीक्षक माजी आमदार प्रवीण दटके , शहर निरीक्षक अतुल दराडे यांच्या उपस्थितीत ग्रामीण व महानगर जिल्हाध्यक्ष पदासाठी अभिप्राय नोंदविण्यात आले. आमदार मुनगंटीवार समर्थक विद्यमान शहर अध्यक्ष राहूल पावडे यांच्यासह डॉ. मंगेश गुलवाडे, सुभाष कासनगोट्टूवार, दशरथसिंग ठाकूर महानगर जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. विशेष म्हणजे मुनगंटीवार समर्थक डॉ.. गुलवाडे यांनी अचानक आमदार किशोर जोरगेवारांना मदत मागितली. त्यांनी स्वतः काही मतदारांशी संपर्क साधला अशी माहिती आहे. त्यामुळे रात्रीच त्यांना मुनगंटीवार गोटातून समजाविण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांना शेवटपर्यंत माघार घेतली नाही. ते या पदासाठी इच्छुक होते. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत विद्यमान जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, क्रिष्णा सहारे, नामदेव डाहूले, विवेक बोढे आहेत. डाहूले यांच्या पाठींशी मुनगंटीवार विरोधी गटातील नेते उभे ठाकले. परंतु मुनगंटीवारांची संघटनेवरील पकड त्यांच्या समर्थकांना तारून नेईल अशी चर्चा आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आमदार बंटी भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, आमदार देवराव भोंगळे, माजी मंत्री शोभा फडणवीस, माजी आमदार संजय धोटे, आमदार अतुल देशकर यांनी अभिप्राय नोंदविली. हा प्रक्रीया तणावपूर्व शांततेत पार पडली. १९९६ मध्ये परशुराम धोटे आणि विजय राऊत जिल्हाध्यक्षपदासाठी समोरसमोर आले. तेव्हा अशाच पद्धतीने अभिप्राय नोंदविल्या गेले. त्यानंतर आजवर जिल्हा भाजपमध्ये शहर, ग्रामीण जिल्हयाची नियुक्ती केली जायची. परंतु सध्या भाजपातील अंतर्गत राजकारण कमालीचे बदलेल आहे. गटतट तयार झाले आहे. त्यामुळे तब्बल तीस वर्षानंतर अभिप्राय नोंदवून जिल्हाध्यक्ष निवडण्याची वेळ पक्षांवर आली. मतदारांना सांभाळून ठेवण्यासाठी दोन्ही गटाकडून कार्यकर्त्यांची फौज तैनात होती. जे संशयित पदाधिकारी आहे. त्यांच्यासोबत आणखी एक मतदार अभिप्राय नोंदविण्यासाठी आत पाठविला जात होता. सकाळच्या सत्रात ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी तर दुपारच्या सत्रात महानगर अध्यक्ष पदासाठी अभिप्राय प्रक्रिया झाली. दरम्यान २ मे नंतर दोन्ही अध्यक्षांची नावे जाहीर होणार अशी चर्चा आहे.
अभिप्राय नोंदविण्याची प्रक्रिया आज मंगळवारी पार पडली. त्यानंतर प्रदेश भाजपची सात जणांची कोअर समितीच्या बैठकीत अभिप्राय मिळालेल्या नावांवर चर्चा होणार आहे. त्यानंतरच जिल्हाध्यक्ष पदांची नावे जाहीर केली जाणार आहेत. कोअर समितीत माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, मंत्री चंद्रकांतदादा पाटील व अन्य एक अशा सात जणांचा समावेश आहे. दरम्यान अध्यक्ष पदासाठी आमदार व खासदारांच्या नावांचा विचार होणार नाही. माजी आमदारांच्या नावाचा विचार होवू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.
ग्रामीण व महानगर अध्यक्ष पदासाठी ओबीसी किंवा कुणबी समाजाचा चेहरा दिला जाईल अशीच चर्चा भाजपाच्या अंतर्गत वर्तुळात आहे. त्यामुळे कुणबी समाजातील युवा चेहऱ्यांची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे वयोमर्यादेचे बंधन आहे.