नागपूर: Manoj jarange patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. यावेळी, भाषण करताना आता मागे हटणार नाही, सककारने गोळ्या घातल्या तरी चालतील पण आम्ही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

या आंदोलनावर महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्यांची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी या आंदोलनामागे नेमकी भूमिका काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच मुद्द्यावर महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे शक्य नाही. पण जरांगेंच्या आंदोलनावर शरद पवार शांत का आहेत? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ओबीसी समाजाचे एक टक्काही आरक्षण कमी होऊ देणार नाही मात्र, त्यासोबतच मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. कुठल्याही समाजाचा हक्क काढून दुसऱ्याला देणे योग्य नसल्याचे मत  बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देशात इडब्ल्यूएस आरक्षणामुळे हजारो लोकांना फायदा झाला आहे. हे आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दिले. तसेच ‘सारथी’ संस्थेमार्फत मराठा समाजालाही मोठा फायदा करून दिला.

काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी

काँग्रेस आणि महाविकास आघाडीने ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे का या बाबत आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. काँग्रेस तर नेहमीच ओबीसींच्या विरोधात राहिली आहे. जर आज ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असतील, तर ओबीसींच्या ३५३ जातींचे आधीच कमी असलेले आरक्षण काढून मराठ्यांना द्यायचे का? असा प्रश्न उपस्थित करत नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही बावनकुळे म्हणाले.

ओबीसी आयोग, ओबीसी मंत्रालय आमच्या सरकारने आणले आहे. मात्र काँग्रेसने नेहमीच ओबीसी समाजावर अन्याय केला आहे.

मराठा समाजाला आमचे सरकार न्याय देणार आहे. आमच्या सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. यात आणखी काय देता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढच्या काळात मराठा समाजाला न्याय देण्याचे काम आमचे सरकार करणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, “जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना शरद पवार गप्प का आहेत? इतर मुद्द्यांवर बोलणारे शरद पवार जरांगे यांच्या आंदोलनावर शांत का? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. त्यांच्या या चुप्पीचा अर्थ महाराष्ट्र समजतो असे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले बावनकुळे

सरसकट आरक्षणावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, “सरसकट आरक्षण शक्य नाही. ज्यांच्याकडे आवश्यक दस्तऐवज आहेत त्यांनाच ओबीसींचा लाभ मिळेल. सर्वेक्षण प्रक्रिया सुरू आहे आणि ती कायम सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी महासंघाच्या आंदोलनावर बोलताना बावनकुळे म्हणाले, राज्यात ओबीसी आणि मराठा समाज गुण्यागोविंदाने राहत आहेत. एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात देणे ही आमच्या सरकारची भूमिका नाही. आमचे महायुती सरकार सर्व समाजाच्या न्यायासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.