अमरावती : भाजपच्‍या नेत्‍या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना आमिर नावाच्‍या व्‍यक्‍तीने तीन दिवसांत धमकीचे दुसरे पत्र सोमवारी पाठवले. त्‍यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ही पत्रे हैदराबाद येथून पाठविण्‍यात आली आहेत. अमरावती पोलिसांचे पथक या प्रकरणाची चौकशी करीत आहेत, पण या धमक्‍या कोण देत आहे आणि त्‍याचा राजकीय संबंध आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे.

हैदराबाद येथून धमकीचे पत्र पाठविणाऱ्याने स्‍वत:चे नाव आमिर असे लिहिले आहे. त्‍याने १० कोटी रुपयांची खंडणीही मागितली आहे. पत्रात पाकिस्तान झिंदाबाद असेही लिहिले आहे. आपल्‍यावर कितीही गुन्‍हे दाखल झाले, तरी पोलीस आपले काहीच बिघडवू शकत नाही, त्‍यामुळे यातून सुटण्‍यासाठी पैसे पाठवावेच लागतील, अशा स्‍वरूपाची धमकी देण्‍यात आली आहे, अशी माहिती राणा यांचे स्‍वीय सहायक विनोद गुहे यांनी दिली.

हे ही वाचा…बडनेरा रेल्‍वेस्‍थानक परिसरात आढळला युवतीचा निर्वस्‍त्र मृतदेह ; हत्‍येचा संशय

नवनीत राणा यांना त्‍याच व्‍यक्‍तीने गेल्‍या शुक्रवारी अशाच स्‍वरूपाचे पत्र पाठवून नवनीत राणा आणि त्‍यांचे पती आमदार रवी राणा यांच्‍याबद्दल असभ्‍य भाषेचाही वापर केला होता. दुसऱ्या पत्राने गांभीर्य वाढले आहे. शहर पोलिसांनी धमकी देणाऱ्या संबंधित व्‍यक्‍तीच्‍या विरूद्ध कायदेशीर कारवाई करावी आणि त्‍याला तातडीने अटक करण्‍यात यावी, अशी मागणी विनोद गुहे यांनी राजापेठ पोलिसांकडे केली आहे. केंद्र सरकारने नवनीत राणा यांना खासदार असल्‍यापासून वाय प्‍लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे, तीच सुरक्षा अद्यापही कायम आहे.

हे ही वाचा…नागपूर: उड्डाण पुलांचा घोळात घोळ, सोयींऐवजी वाहतूक कोंडीची भर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवनीत राणांची वादग्रस्‍त वक्‍तव्‍ये

सुमारे पाच महिन्‍यांपुर्वी लोकसभा निवडणुकीच्‍या प्रचारादरम्‍यान नवनीत राणा यांनी हैदराबादमध्‍ये ओवेसी बंधूंविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केले होते. या सभेत नवनीत म्हणाल्या होत्या, ‘छोटा म्हणतो १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा. मग आम्ही काय करू शकतो ते दाखवू. मी छोट्याला सांगते, तुला १५ मिनिटे लागतील, पण आम्हाला फक्त १५ सेकंद लागतील. १५ सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर छोटा व मोठा कुठून आला व कुठे गेला हे कळणारही नाही.’या वक्‍तव्‍यामुळे हैदराबादेत त्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हा देखील दाखल करण्‍यात आला होता. ५ मे रोजी गुजरातमध्ये प्रचार करताना नवनीत राणा म्हणाल्या होत्या की, ज्याला जय श्रीराम म्हणायचे नसेल, तो पाकिस्तानात जाऊ शकतो. हा हिंदुस्थान आहे. भारतात राहायचे असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल.