नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना उर्फ हिना खान हत्याकांडाला तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून अद्यापपर्यंत सना यांचा मृतदेह पोलिसांना गवसला नाही. परंतु, पोलीस अजुनही सना यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची तयारी पोलिसांकडून पूर्ण झाली असून आठवडाभरात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. सनाचा मृतदेह मिळाला नसला तरी आरोपी विरूध्द पोलिसांकडे भक्कम असे तांत्रिक पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

भाजप नेत्या सना खान यांची जबलपुरातील कुख्यात गुन्हेगार अमित साहूशी ओळख झाली. अमितला भाजपकडून मध्यप्रदेशात आमदारकीची निवडणूक लढवायची होती. त्यामुळे सना खानच्या माध्यमातून त्याने भाजपाच्या मोठमोठ्या नेत्यांशी ओळखी करणे सुरु केले होते. अमितने सना यांना कट रचून प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि प्रेमविवाह केला. दोघेही मध्यप्रदेशात काही दिवस सोबत राहत होते. सना यांनी अमितला काही दागिने दिले होते. अमितने ते दागिने परस्पर विकले, यावरून त्यांच्यात वाद होता.

हेही वाचा… नागपूर: अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे

सना खान यांची २ ऑगस्टला जबलपुरात हत्या झाली. मानकापूर पोलिसांनी अमित उर्फ पप्पू साहू (४०) याला जबलपुरातून अटक केली. सना यांच्या डोक्यावर मारलेली हॉकीस्टिक, कारच्या डिक्कीतील रक्ताचे डाग, कार स्वच्छ केल्याचा पुरावा यासोबत मोठ्या प्रमाणात तांत्रिक पुरावे पोलिसांनी गोळा केले. या प्रकरणात पप्पूसह त्याचा मित्र राजेश सिंह, धमेंद्र यादव, रब्बू उर्फ रविशंकर यादव व नोकर कमलेश पटेल, असे पाचही आरोपी कारागृहात आहेत. आरोपीने सनाचा खून कशा पध्दतीने केला? तिचा मृतदेह कसा नदीत फेकला? पुरावे कुठे नष्ट करण्यात आले.

अशी घडली घटना

अमितची भेट घेण्यासाठी सना या एक ऑगस्टच्या रात्री जबलपूरला गेली. २ ऑगस्टला तिने आईला फोन करून पोहोचल्याची माहिती दिली. त्यानंतर तिचा फोन बंद झाला. सनाशी संपर्क होत नसल्याने तिची आई मेहरूनिसा खान (५४) यांनी मानकापूर पोलिसांत सना बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी जबलपूरहून अतिमच्या नोकराला ताब्यात घेतले. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. फरार झालेल्या अमितला जबलपुरातून हुडकून काढले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपपत्र दाखल करण्याची तयारी पूर्ण

सना खान हत्या प्रकरणात आठवडाभरात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येईल. त्याची संपूर्ण तयारी झाली आहे. आरोपीच्या अटकेपासून ९० दिवसाच्या आत न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे लागते. त्यानुसार ११ नोव्हेंबरला तो कालावधी पूर्ण होत आहेत. या प्रकरणातील पाचही आरोपी कारागृहात आहेत. सनाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. – राहुल मदने, पोलीस उपायुक्त