अकोला: मतदार यादीतील घोळाचा मुद्दा नेहमीच प्रकाशझोतात असतो. मतदार यादीतील चुका, त्रुटी, मतदारांची नावे यावरून अनेक वेळा विरोधकांकडून निवडणूक आयोगाला लक्ष्य केल्या जाते. आता तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या चुकांवर बोट ठेवले आहे. विधानसभेच्या इतर मतदारसंघातील नावे, एकाच मतदाराचे अनेक वेळा नावे असे अनेक गैरप्रकार मतदार यादी झाल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे.
या प्रकरणात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून मतदार यादीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. यावर निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का बसला. या मतदारसंघातून काँग्रेसने काठावर विजय मिळवला.
दरम्यान, या पराभवाचे मतदार यादीवर भाजपने खापर फोडले. अकोला पश्चिम मतदारसंघातील मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप भाजपने केला. ‘अकोला पश्चिम’ मध्ये २४ हजारावर मतदारांची यादीत दोनदा, तिनदा नावे आहेत. इतर मतदारसंघातील नावांचाही या मतदारसंघात समावेश आहे, अशी तक्रार भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली. या संदर्भात पडताळणी करून दुसऱ्या मतदारसंघातील व दोनदा आलेली नावे वगळण्याची मागणी करण्यात आली आहे. या मतदारसंघामध्ये २४ हजार पेक्षा जास्त मतदारांची नावे मतदार यादीमध्ये दोनदा समाविष्ट झाली. बाळापूर मतदारसंघातील एक हजार ४०० मतदारांच्या नावाचा समावेश देखील ‘अकोला पश्चिम’मध्ये आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे पुरावे सुद्धा सादर करण्यात आल्याचा दावा भाजपने केला.
केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार; निवडणूक आयुक्त म्हणतात…
२४ हजार नावे दोनदा असल्याने ती काढण्यात यावी, तसेच बाळापूर मतदारसंघातील नावे ‘अकोला पश्चिम’ मधून वगळण्यात यावेत, अशी मागणी विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार करण्यात आली आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या माध्यमातून सुद्धा तक्रारी करण्यात आल्या. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या आगोदर यादी दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी केली. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार पाठवण्यात येणार असून त्यांच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल. इतर मतदारसंघातील नावे कमी करण्यात येतील, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.