कायदा हा सर्वांसाठी समान असतो,असे नेहमीच भाजपचे नेते ई.डी.ची कारवाई झालेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना सांगत असतात. मात्र प्रत्यक्षात ते आचरणात आणत नाहीत. सत्ता असल्याने आपल्याला काहीही करता येते, कायदा, नियम आपल्यासाठी नाहीत अशीच समजूत या नेत्यांची झाली आहे. याचा प्रत्यय आला. तोही खुद्द मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात. भाजपच्या आमदारानेच सार्वजनिक ठिकाणी वाहतूक नियमाचे उल्लंघन केले. हेल्मेट न घालता पोलिसांच्याच दुचाकीवर स्वार झाले आणि स्टंटही केले. हा व्हीडीओ व्हायरल झाल्याने त्यांची पंचाईत झाली. आता बघायचे ते पोलिस त्यांच्यावर कारवाईची हिम्मत दाखणार का ?
केंद्र सरकारने पाकिस्तान विरुद्ध केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत. दुचाकी रॅली काढल्या जात आहेत. हाती तिरंगा घेऊन भाजप नेते कायर्कर्ते त्यात सहभागी होत आहे. भारत मातेचा जयघोष केला जात आहे. मात्र हे सर्व करताना उत्साहाच्या भरात त्यांना नियम व कायद्याचाही विसर पडलेला दिसतोय. सावनेरमध्ये हेच घडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, तिरंग्याच्या सन्मानार्थ शुक्रवारी सावनेरमध्ये ‘तिरंगा बाईक रॅली” काढण्यात आली. त्याचे नेतृत्व केले या भागाचे भाजप आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी. अत्यंत उत्साहात ते या यात्रेत सहभागी झाले होते. तिरंगा हातात घेऊन निघालेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी सावनेरच्या वस्त्या दुमदुमल्या होत्या.
यात्रेला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आमदार आशीष देशमुख यांचा उत्साह वाढला. त्यांनी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्याचीच दुचाकी घेतली व हेल्मेट न घालताच ते चालवू लागले. यात्रा जसजशी पुढे जात होती तसतसा आमदार देशमुख यांचा उत्साह वाढत होता.एकवेळ तर त्यांना त्यांच्या मागे पोलीस अधिकारी बसले याचा विसरच प डला आणि ते दुचाकीवर उभे होत होतो.
नियम काय म्हणतो ?
राज्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचे केले आहे. हेल्मेट न घालता दुचाकी वाहन चालवणे गुन्हा आहे. पोलिसांना आढळून आले तर वाहन चालकाला दंड केला जातो. नागपूर शहरात व अन्य ठिकाणी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते. सावनेरमध्ये खुद्द आमदारांनीच हेल्मेट न घालता दुचाकी चालवलीा. तीही पोलीस अधिकारी त्यांच्या मागे बसले असताना हा अजून गंभीर गुन्हा आहे. प्रश्न उरतो तो आता कारवाईचा. सावनेर पोलीस आमदार देशमुखांवर दंडात्मक कारवाई करणार का? ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्याना स्वत:ची दुचाकी दिली त्याच्यावर कारवाई होणार का ? बंदोबस्तावर असताना आमदारासोबत दुचाकीवर फिरणे नियमात बसते का ? असे अनेक प्रश्न आता व्हीडीओ व्हायरल झाल्याने सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
अखेर देशमुखांवर दंडात्मक कारवाई
स्टंट बाजी करणारे भाजप आमदार आशीष देशमुख यांना वाहतूक पोलिसांनी २५०० रुपये दंड केला.
हेल्मेट न घालता वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली