नुकतेच राज्याचे पावसाळी अधिवेशन संपले. अधिवेशन काळात विरोधकांनी अनेक मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे विधानभवनाच्या पायऱ्यांवर चांगलाच राडा पहायला मिळाला. त्यानंतर आता एका वेगळ्याच व्हिडिओमुळे भाजपा चर्चेत आली आहे. भाजपा आमदार टेकचंद सावरकर यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ‘आला बाबूराव’ गाण्यावर सावरकरांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

टेकचंद सावरकर नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील भाजपाचे आमदार आहेत. वाढदिवसाच्या कार्यक्रमात टेकचंद सावरकरांनी हा भन्नाट डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन पार पडले. पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला. राष्ट्रवादीचे आमदार आणि शिंदे गटाचे आमदार यांच्यामध्ये ही धक्काबुक्की झाली. हा वाद मिटल्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी तुम्हाला धक्काबुक्की केली का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर भरत गोगावले रागाने म्हणाले, अरे हट् ! ते आम्हाला कसली धक्काबुक्की करणार आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली. त्यांनी आमचा नाद करु नये. आमच्या अंगावर कुणी आले तर शिंगावर घेऊ, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला होता.