गडचिरोली : ‘ओबीसी’ आरक्षणात मराठा समाजाला सरसकट समाविष्ट करण्याच्या मागणीला तीव्र विरोध दर्शवत मनोज जरांगे यांच्या भूमिकेविरोधात भारतीय जनता पार्टी-ओबीसी मोर्चाच्या वतीने गुरुवारी गडचिरोली शहरात जोरदार निदर्शने करण्यात आले. शहरातील इंदिरा गांधी चौकात झालेल्या या आंदोलनावेळी ‘जरांगे मुर्दाबाद’च्या घोषणाही देण्यात आल्या.
ओबीसी आरक्षण हा आमचा घटनात्मक हक्क असून त्यावर कुणाचीही घुसखोरी आम्ही सहन करणार नाही. मनोज जरांगे हे ओबीसींच्या हक्कांवर आघात करत आहेत. त्यांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. आज गडचिरोलीतून निषेधाचा आवाज उठला असून, यापुढे प्रत्येक तालुक्यात आक्रमक आंदोलन करून जरांगे यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असा इशारा माजी खासदार अशोक नेते यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान आंदोलकांनी ‘जरांगे मुर्दाबाद’च्या घोषणाबाजीसह आपला संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला चपलांनी मारून निषेधाचा इशारा दिला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांच्या रक्षणासाठी आक्रमक व ठाम भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. निषेधानंतर भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने त्यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली आणि निवेदन दिले. या निवेदनातून ओबीसी आरक्षण अबाधित ठेवावे, तसेच कुणाच्याही दबावाखाली या आरक्षणात कोणताही बदल करू नये, अशी ठाम भूमिका व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनात माजी खासदार व भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, ओबीसी नेते प्रशांत वाघरे, प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, डॉ. चंदा कोडवते यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.