महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी

महापालिका निवडणुकीमध्ये चार वार्डाचा एक प्रभाग करण्यात आल्यानंतर विविध राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांनी निवडणूक लढण्यासाठी आपापल्या प्रभागात तयारी सुरू केली आहे. सत्तापक्ष भाजपही यात मागे नाही. महापालिकेवरचा भगवा कायम ठेवण्यासाठी पक्षाने कंबर कसली असून उमेदवारांची निवड करताना यंदा पाच वर्ष सक्रिय नसलेल्यांना डच्चू देण्यात येणार असल्याची माहिती भाजपातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यात काही ज्येष्ठ सदस्यांचा समावेश असून त्यांच्या कानापर्यंत ही बाब गेल्यावर त्यांनी स्वत:हून माघार घेत असल्याचे पक्षाच्या ‘कोअर कमिटी’ला कळविले आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, या शिवाय केंद्रातील दुसऱ्या क्रमांकोचे मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर हे गृह शहर आहे, त्यामुळे येथील महापालिकेची निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. सलग दहा वर्ष पक्ष सत्तेत असल्याने व महापालिकेतील कामगिरी सुमार असल्याने लोकांची भाजपवर नाराजी आहे. ही बाब ओळखूनच भाजपने ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. कुठलाही धोका पत्करायचा नाही असे ठरवून मोर्चेबांधणी केली जात आहे. उमेदवाराच्या निवडीपासून याची सुरुवात होणार आहे. अलीकडेच झालेल्या पक्षाच्या एका बैठकीत पाच वर्ष सक्रिय नसलेल्या काही ज्येष्ठ नगरसेवकांना यंदा विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात काही माजी महापौर, उपमहापौरांचा तसेच सुधार प्रन्यासवरील माजी विश्वस्तांचा तसेच महामंडळावर नियुक्त सदस्यांचाही समावेश आहे. पक्षाचे काही नगरसेवक आमदार झाल्याने त्याच्या वॉर्डात नवीन चेहरा दिला जाणार आहे. यात आमदार अनुक्रमे अनिल सोले, सुधाकर कोहळे आदींचा समावेश आहे. विद्यमान नगरसेवक, माजी महापौर माया इवनाते, सुनील अग्रवाल, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, माजी उपमहापौर संदीप जाधव, प्रन्यासचे माजी विश्वस्त रवींद्र भोयर आणि बांधकाम व इतर कामगार महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव आदींना यावेळी विश्रांती दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

चार वार्डाचा एक प्रभाग करण्याचा निर्णय झाला असला तरी प्रभागाचे आरक्षण अद्याप ठरलेले नाही. हे ठरल्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ‘अभी नही तो कभी नाही’ अशी मानसिकता सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे. भाजपमध्ये हे प्रमाण जास्त आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची तयारी आहे त्यामुळे उमेदवाराची निवड करताना भाजपपुढे अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपने प्रत्येक प्रभागात संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने ७२ प्रभागातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आणि आजी माजी नगरसेवकांचा अभ्यास वर्ग सुरू केला असून त्यात दररोज एक प्रभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बौद्धिक दिले जाते. अनेक प्रभागात विद्यमान नगरसेवकांविरोधात असलेली नाराजी या प्रभागाच्या बैठकीतून समोर येत असताना त्या प्रभागातून निवडणूक लढण्यास कुठला पदाधिकारी किंवा कार्यकर्ता सक्षम आहे आणि त्याचा प्रभागातील जनतेशी संवाद आहे, याचा अंदाज कोअर कमिटीच्या सदस्यांकडून घेतला जात आहे.

ही नियमित प्रक्रिया

महापालिकेतील काही ज्येष्ठ आणि अनुभवी असलेल्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड होत असतेच त्यामुळे त्यांना डच्चू दिला असा अर्थ होत नाही. ज्येष्ठ सदस्यांवर संघटनात्मक काम करण्याची जबाबदारी दिली जाते आणि ती प्रक्रिया सुरू आहे. महापालिका निवडणुकीत युवकांना संधी देण्याची परंपरा पक्षामध्ये असल्यामुळे यावेळी त्याच पद्धतीने कोअर कमिटी निवड करणार आहे. महापालिकेत अनुभवी सदस्यांची गरज असल्यामुळे ज्या प्रभागात गरज आहे, अशा ठिकाणी ज्येष्ठ सदस्यांना संधी देण्यात येईल.

– गिरीश व्यास, आमदार व प्रदेश प्रवक्ते, भाजप