नागपूर : महापालिका निवडणूक येत्या पाच-सहा महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी शहरातील विविध समस्यांना घेऊन महापालिका प्रशासकांविरुद्ध दंड थोपटल्याचे चित्र आहे. राज्यात सत्ता असतानाही आणि महापालिकेत सलग तीन वेळा सत्ता भोगली असतानाही लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपवरच आंदोलनाची वेळ आली आहे. शुक्रवारी आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात महापालिकेविरुद्ध आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, गुरुवारी आमदार प्रवीण दटके यांनी नागनदीच्या प्रश्नावरून महापालिकेला धारेवर धरले होते.

यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष बाल्या ऊर्फ नरेंद्र बोरकर म्हणाले, पूर्व नागपुरातील शास्त्रीनगर उद्यानात दिवे बसवण्याची, सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची मागणी केली होती. पण, ती पूर्ण झाली नाही. तसेच प्रभाग क्रमांक २३ मधील कुंभारटोली येथे नागनदीच्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम करण्याचे कार्यादेश देऊन सुमारे एक वर्ष झाले तरी अद्याप बांधकाम झाले नाही. आदर्शनगर झोपडपट्टी येथील नाल्याची सुरक्षा भिंत बांधण्यात यावी. अन्यथा या पावसाळ्यात या झोपडपट्टी पाणी शिरून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच भारतमाता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे रोज नियमित मोठ्या संख्यने लोक येतात. परंतु, महापालिका प्रशासनाचे या उद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. उद्यानातील वाँकिंग ट्रॅकवर लावण्यात आलेला कोटा जुना व गुळगुळीत झाला आहे. पावसाळ्यात या ट्रॅकवर पाणी असते. त्यामुळे पायी चालणाऱ्यांची गैरसोय होते. बहुतेकदा लोक ट्रॅकवर घसरुन पडले आहेत. येथे नवीन ट्रॅकचे बांधकाम करणे अत्यंत गरजेचे आहे.

उद्यानातील प्रसाधन गृह व शौचालय बंद आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. विशेषतः महिलांना व वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. या उद्यानात नवीन प्रसाधन गृह व शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नागपूर महापालिका प्रशासनाने नागनदीची स्वच्छता करण्याचे नाटक केले. महापालिकेने नागनदीची खर्‍या अर्थाने स्वच्छता न करता केवळ लोकांना दाखवण्यासाठीचे काम केले. स्वच्छतेच्या नावाखाली महापालिकेच्या कृतीवर अविश्वास आणि नाराजी व्यक्त केल्या जाते, असे लिहून आमदार प्रवीण दटके यांनी चित्रफीत समाज माध्यमावर व्हायरल केली आहे.