गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी काही दिवसांपूर्वी मित्रपक्ष असलेल्या भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने पत्रकार परिषद घेत आक्रमक पवित्रा घेतला. युतीधर्म पाळल्यामुळेच तुमचा विजय झाला, भाजपवर निराधार आरोप करणे थांबवा, अन्यथा आगामी निवडणुका स्वबळावर लढू, असा थेट इशाराच भाजपने आत्रामांना दिला आहे.
आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वी महायुतीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपवर पुतण्याला पाच कोटी देऊन विरोधात उभा केल्याचा गंभीर आरोप केला होता. यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत वाद पेटला असून भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. आत्राम यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजप पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राज्यात तीन पक्षांचे महायुती सरकार आहे. अहेरी विधानसभा मतदारसंघात भाजपची मोठी ताकद असतानाही, केवळ युतीधर्म म्हणून धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी दिली. आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले, म्हणूनच त्यांचा विजय झाला. भाजपचा त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा आहे. मात्र, विजय मिळाल्यानंतर आत्राम भाजपवर विनाकारण आगपाखड करत आहेत. त्यांचे सर्व आरोप निराधार आहेत. यापुढे अशा प्रकारचे आरोप खपवून घेतले जाणार नाही. असा इशारा बारसागडे यांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. देवराव होळी यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष
मागील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बहुतांश ठिकाणी भाजपची सत्ता होती. त्यामुळे आम्हाला ‘तुकडा’ देणारे धर्मरावबाबा कोण, त्यांनी अशी भाषा वापरू नये. भाड्याने कार्यकर्ते आणून सभा घेणारा पक्ष भाजप नाही. आम्ही दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांपुढे युतीचा प्रस्ताव नक्कीच ठेवणार आहोत. पण धर्मरावबाबा जर अशाच प्रकारची भाषा वापरणार असतील, तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यास तयार आहोत. आम्ही स्वबळावर लढून सत्ता स्थापन करू, असा दावा बारसागडे यांनी यावेळी केला. तसेच इच्छुक उमेदवारांना पक्षाच्या निवड प्रक्रियेतून गेल्यावरच उमेदवारी मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.