नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जननालाल बजाज प्रशासकीय परिसराजवळ असलेल्या विद्यापीठाच्या मोकळ्या मैदानावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या ‘राष्ट्रीय नमो युवा संमेलन’चे आयोजन करण्यात आले आहे.

शैक्षणिक परिसरातील मैदानात राजकीय पक्षाचा कार्यक्रम होत असल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विद्यापीठाने राजकीय पक्ष व त्यांच्या संघटनांना कार्यक्रमासाठी मैदान देण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला जात आहे. भाजयुमोकडून ४ मार्चला ‘राष्ट्रीय नमो युवा संमेलन’ होणार आहे. यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा युवकांना मार्गदर्शन करतील. संमेलनात राज्याच्या वेगवेगळ्या भागातील एक लाख युवा सहभागी होतील. हा सोहळा विद्यापीठाच्या मैदानात होणार आहे.

हेही वाचा…मोदींच्या सभेने महायुतीचा उत्साह वाढला, यवतमाळ मतदारसंघ भाजप की शिंदे गटाकडे ?

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये राजकीय पक्ष आणि त्यांच्या संघटनांच्या सभा, मेळाव्यांना मैदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी काही अटी व शर्ती घालून देण्यात आल्या आहेत. विद्यापीठ यासाठी शुल्कही आकारणार आहे. मात्र, शैक्षणिक परिसरातील मैदानात राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यास विरोध होत आहे.

राष्ट्रवादीच्या विदर्भ विद्यार्थी प्रमुख माधुरी पालीवाल यांनी याला निषेध केला आहे. तसेच एनएसयूआय आणि युवक काँग्रेसनेही विरोध करत निर्णय तत्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. युवा ग्रज्युएट फोरमनेही या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा…“रिकामी माझी घागर…” पाणी समस्या सोडविण्यासाठी ‘वंचित’चे असेही आंदोलन…

व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयात काय?

व्यवस्थापन परिषदेने राजकीय पक्ष आणि संघटनांना कार्यक्रमासाठी मैदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ५० हजार रुपये अमानत रक्कम आणि एक लाख रुपये भाडे असे शुल्क आकारण्यात येणार आहे. हिंसाचार, देशविरोधी वक्तव्य होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जाणार आहे. शिवाय कार्यक्रमाला येणाऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश नाकारण्यात येणार आहे. तसेच सुरक्षा, वीज, पाणी याची सुविधा आयोजकांना स्वत: करावी लागणार आहे.

विद्यापीठ आहे की राजकीय आखाडा?

भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमांना विद्यापीठ प्रशासन थेट परवानगी देत असल्याचा आरोप युवा ग्रॅज्युएट फोरमचे अतुल खोब्रागडे यांनी केला आहे. नमो रोजगार मेळावा, खासदार औद्योगिक महोत्सव आणि आता भाजयुमोचा कार्यक्रम होत आहे. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांना व्यवस्थापन परिषदेने परवानगी दिल्याची माहिती आहे. मात्र, हे चुकीचे आहे. या मैदानाच्या बाजूला शैक्षणिक विभाग व त्यांच्या प्रयोशाळाही चालतात. असे असताना राजकीय पक्षासाठी जागा देणे म्हणजे विद्यापीठाचा राजकीय आखाडा करण्याचा प्रकार असल्याचा आरोपही खोब्रागडे यांनी केला आहे.

हेही वाचा…लाेकसभेच्या तोंडावर अमित शाह विदर्भात, अकोल्यात ५ मार्चला पाच मतदारसंघांवर भाजपचे मंथन; शिंदे गटाच्या मतदारसंघांचा…

राजकीय पक्ष आणि त्यांच्या संघटनांच्या कार्यक्रमाला मैदान देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला. यासाठी नियम, अटी, शर्ती घालून देण्यात आल्या आहेत. -डॉ. राजू हिवसे, कुलसचिव, रातुम नागपूर विद्यापीठ.