यवतमाळ : दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्यात सभा घेण्याचा क्रम यावेळीसुद्धा कायम राहिला. प्रत्येकवेळी मोदींच्या सभेनंतर यवतमाळ जिल्ह्यात भाजपला मोठा फायदा झाला आहे. यवतमाळात शासकीय कार्यक्रम असला तरी कार्यक्रमाचा संपूर्ण बाज आणि मोदींचे भाषण हे राजकीय स्वरूपाचे होते. त्यामुळे मोदींच्या या सभेने यवतमाळ जिल्ह्यात राजकीय धृवीकरण होवून त्याचा फायदा महायुतीस होण्याची चिन्हे आहेत.

यवतमाळच्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी यवतमाळ जिल्हा आणि विदर्भाने प्रत्येकवेळी आपल्याला भरभरून दिले, असे सांगितले. २०१४ मध्ये यवतमाळात झालेल्या ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमानंतर झालेल्या लोकसभा निडणुकीत भाजपने बहुमत मिळाले होते. तर २०१९ मध्ये केळापूर येथे झालेल्या सभेनंतर झालेल्या निवडणुकीत ३०० चा आकडा गाठला होता. यावेळी यवतमाळ येथील सभेत मोदींनी यवतमाळकरांच्या आशीर्वादाने ‘अबकी बार चार सौ पार’ होईल, असा विश्वास व्यक्त केला. या सभेतील शासकीय योजनांची आकडेवारी वगळता मोदींचे भाषण पूर्णत: राजकीय होते. त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका करत, काँग्रेसने येथील गोरगरीब जनतेला कसे लुटले, याचे दाखले दिले. त्यामुळे मोदींचे भाषण जिल्ह्यात महायुतीसाठी फायदा होईल, अशी चिन्हे आहेत.

हेही वाचा :Loksabha Election: कर्नाटक काँग्रेससमोर भाजपा-जेडीएस युतीचे आव्हान, सिद्धरामय्या-शिवकुमार यांची जोडी निवडणुकीसाठी तयार

राज्यातील बदललेल्या सत्तासमीकरणानंतर जिल्ह्यात सर्व लोकप्रतिनिधी हे महायुतीचे आहेत. भाजपचे पाच तर राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा प्रत्येकी एक आमदार आहे. यवतमाळ-वाशिम आणि हिंगोली-उमरखेड येथील आमदारही शिवसेना(शिंदे गट)चे आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघावर विद्यमान खासदार भावना गवळी यांनीच दावा सांगितला आहे. मात्र भाजपला येथे उमदेवार बदलून हवा असल्याने मोदींच्या सभेच्या अनुषंगाने या मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराची चाचपणीसुद्धा भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात आली.

हेही वाचा : हरियाणा भाजपामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी चढाओढ; ‘या’ चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळच्या सभेत केलेले भाषण बघता, त्यांनी जिल्ह्यातील बहुसंख्य बंजारा आणि आदिवासी समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. ‘जय सेवालाल’ आणि ‘जय बिरसा’ या घोषणा देतानाच गोरबंजारा समाजाची बोलीभाषा असलेल्या गोरमाटीत त्यांनी निवेदन केल्याने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील पुढील उमेदवार हा बंजारा समाजाचा असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नावाकडे अनेकांचा रोख आहे. भाजपच्या गोटात भावना गवळी नको, अशी चर्चा असताना शिंदे गटाला ही जागा सोडायची झाल्यास संजय राठोड यांच्याशिवाय दुसरा उमेदवार नाही. भाजपचे वर्धा आणि यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक आ. मदन येरावार आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी हातात हात घालून पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. शिवाय पंतप्रधानांच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी दुसऱ्या रांगेत बसले असताना संजय राठोड हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बाजूने पहिल्या रांगेत बसले होते. पंतप्रधानांना अनेक भेटवस्तू देण्यात सक्रिय सहभागही राठोड यांनी घेतला. याच कार्यक्रमात विद्यमान खा. भावना गवळी यांना मात्र पंतप्रधानांशी थेट बोलण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागल्याचे अनेकांनी पाहिले. या सर्व घटनाक्रमावरून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलणार तर नाही ना, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र खा. भावना गवळी यांनी यापूर्वी यवतमाळ येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात ‘मेरी झांसी नही दुंगी’ म्हणत आपणच या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.

हेही वाचा : करमाळ्याच्या बागल गटाचे पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण! भाजपमध्ये स्थिरावरणार का ?

जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत असताना पंतप्रधानांनी त्यांच्या सभेत शेतकऱ्यांबद्दल, कापूस, सोयाबीनच्या भावाबद्दल अवाक्षरही काढले नाही. संपूर्ण भाषण प्रचारकी थाटात झाले. मात्र याविरोधात शिवसेना (उबाठा) वगळता विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी(शरद पवार) या पक्षांनी साधे निषेधाचे सूरही आवळले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात विरोधी पक्ष नसल्यातच जमा असल्याची नागरिकांची भावना आहे. विरोधी पक्षांचा हा नाकर्तेपणा सत्ताधारी महायुतीच्या पथ्यावर पडण्याची चिन्हं जिल्ह्यात आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनात जोश संचारल्याचे चित्र आहे.