वर्धा : भाजपची विदर्भस्तरीय बैठक आज सूरू होणार. सेवाग्राम येथील चरखा भवन त्यासाठी सज्ज झाले आहे. पावसाचे सावट लक्षात घेऊन भवन परिसरात भव्य डोम उभारण्यात आला आहे. विदर्भातील भाजपचे सर्व मंत्री, आजी माजी खासदार व आमदार, जिल्हाध्यक्ष तसेच प्रदेशाध्यक्ष व अन्य पदाधिकारी हजेरी लावतील. संघटन सचिव डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बैठक प्रथम केळझर येथे गणेशाच्या साक्षीने होणार होती. पावसामुळे गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थळ बदलण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष संजय गाते सांगतात. पण गणेशाचे वरदान हवेच म्हणून सकाळी केळझर येथे विघ्नहर्त्यास अभिषेक करण्यात आला. यथासांग पूजा घालण्यात आली. पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर, सौ शीतल भोयर, माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, सौ जयश्री गफाट तसेच श्रीधर व श्रेया देशमुख या दाम्पत्याने मंत्रोच्चार केले. सर्व निर्विघ्नपणे पार पडू दे. पुरेसा पाऊस पडून बळीराजा सुखी होवू दे, असे वरदान मागण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस हे या बैठकीत समारोपीय भाषण करणार होते. पण त्यात आता बदल करण्यात आला आहे. ते प्रारंभीच हजेरी लावत उद्घाटन करणार. मुख्यमंत्री १२ वाजता थेट बैठकस्थळी चरखा भवन येथे पोहचतील. दुपारी दीड वाजता सरळ नागपूरला निघणार आहे. आता समारोपीय भाषण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे करणार आहे. हा वेळेवरील बदल मुख्यमंत्र्यांना अन्य कार्यक्रमामुळे करावा लागल्याचे सांगण्यात आले. उदघाटन प्रसंगी प्रमुख पदाधिकारीच बोलावण्यात आले आहे. समारोप झाल्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना भेटीची वेळ दिली आहे. दुपारी चार वाजता ही गाठभेट असून लेखी निवेदन आणण्याची सूचना स्वीय सचिव विपीन पिसे यांनी केली आहे. एकूणच विदर्भातील सर्व जिल्ह्याचे भाजप पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. त्या दृष्टीने बैठकीत मार्गदर्शन केल्या जाणार. आमदारांच्या व मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी, जनतेच्या मनात काय हे आगामी निवडणुकीत दिसेलच, असे सूचक विधान केलेच आहे. म्हणून निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार.