मुंबई महापालिकेत पारदर्शक कारभार नसल्यामुळे आणि निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या विकासकामांचे वाभाडे समोर येत असताना चुकीच्या माहितीच्या आधारे नागपूर महापालिकेवर आरोप केले जात आहेत. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत. त्यांची पारदर्शकपणे चौकशी केली जाईल, असे प्रतिआव्हान महापौर प्रवीण दटके यांनी शिवसेनेला दिले आहे.

प्रवीण दटके म्हणाले की, पारदर्शकतेच्या मुद्दय़ावर संयुक्त महाराष्ट्रात नागपूर ही उपराधानी आहे, हे शिवसेनेने मान्य केल्यामुळे त्यांचे अभिनंदन. आजपर्यंत शिवसेनेने नागपूरची कधीच चिंता केली नाही. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नागपूर महापालिकेच्या पारदर्शी कारभाराची आठवण झाली. मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता नसल्यामुळे त्याचे खापर फोडण्यासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर आहे म्हणून ते बदनाम करण्यासाठी चुकीच्या माहितीच्या आधारे हे आरोप केले जात आहेत. त्यांना ही माहिती कोण देत आहे? त्यांनी महापालिकेत येऊन चौकशी करावी. २४ बाय ७ ही योजना मंजूर झाली त्या वेळी महापालिकेत शिवसेनेचा उपमहापौर होता. शिवाय, स्थायी समितीत शिवसेनेचे सदस्यही होते. कुणाच्या नातेवाईकांना कंत्राट दिले, त्याचे पुरावे दिले तर आयुक्तांकडून त्याची चौकशी केली जाईल.

साडेचार हजार कोटींचे सिमेट रस्ते शहरात झाल्याचे सांगून त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे, पण अजून ४५०० कोटींचे रस्तेच शहरात झालेले नाहीत. दोन टप्प्यांत काम सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. ज्या मुंबईच्या कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत असल्यामुळे त्याचे कंत्राट निविदा काढण्यापूर्वी रद्द करण्यात आले. मुंबईच्या डम्पिंग यार्डमध्ये मोठा घोटाळा झालेला असताना त्यांनी नागपूरच्या डम्पिंग यार्डबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभार समोर येऊ नये म्हणून परब असे आरोप करीत आहेत, पण त्यांनी या आरोपाच्या पुष्टय़र्थ पुरावे दिले तर नागपूर महापालिका पारदर्शपणे त्याची चौकशी करेल, असेही दटके म्हणाले.