scorecardresearch

बिबट्यासह तीन रानडुकरांचे मृतदेह आढळले

तिरोडा तालुक्यातील तिरोडा वनक्षेत्रातील पिंडकेपार अर्जुनी, बीट गोंडराणी येथील विहिरीत शनिवारी एक बिबट्या व तीन रानडुकरांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाले.

(संग्रहित छायाचित्र)

नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात वाघाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता तिरोडा तालुक्यात बिबट्यासह तीन रानडुकरांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह विहिरीत सापडल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे.

तिरोडा तालुक्यातील तिरोडा वनक्षेत्रातील पिंडकेपार अर्जुनी, बीट गोंडराणी येथील विहिरीत शनिवारी एक बिबट्या व तीन रानडुकरांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाले.

तीन ते चार दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही खासगी शेतातील व वापरात नसलेली, अर्धवट बुजलेली विहीर होती. या विहिरीच्या आसपास  जंगल नाही. तीन ते चार दिवसांपूर्वी या परिसरातून काही पडल्याचा आवाज आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

सुरुवातीला  वीजप्रवाह सोडून केलेल्या शिकारीचा तर प्रकार नाही ना, अशीही शंका व्यक्त करण्यात आली. विहिरीत आडवे खांब असल्याने अर्धवट कुजलेल्या चारही मृतदेहावर जखमा होत्या.

 उपवनसंरक्षक कुलराज सिंग, साहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी आकरे, मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर, मुकुंद धुर्वे यांनी घटनास्थळी पाहणी केली. शवविच्छेदनानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात  आले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bodies of three cows including a leopard found akp

ताज्या बातम्या