अकोला : मुसळधार पाऊस पडत असतांना शहरातील टिळक मार्गावर अचानक उघड्या नाल्यामध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल १२० कि.मी. दूर पूर्णा नदीत मंगळवारी आढळून आला आहे. सलग तीन दिवस शोध मोहीम सुरू होती. मोठ्या परिश्रमानंतर मृतदेहाचा शोध लावण्यात पथकाला यश आले.

शहरातील टिळक मार्गावरील जुना कपडा बाजार चौकातील भुयारी गटार नाल्यात २७ सप्टेंबर रोजी रात्री सोनू कन्नू करोसिया (वय ४१ वर्ष, रा.देशमुख फैल, अकोला.) पडले होते. मुसळधार पावसामुळे नाल्यात ते वाहून गेले. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून शोध कार्य राबविण्यासाठी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनद्वारे संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना पाचारण केले.

सहकारी ऋषिकेश राखोंडे, अंकुश सदाफळे, नितीन कोलटके, शेखर केवट, अश्विन केवट, मयुर सळेदार, विकास सदांशिव, प्रतिक बोरसे, हर्षल वानखडे यांच्यासह ते घटनास्थळावर दाखल झाले. शोध व बचाव मोहीम सुरू करण्यात आली. पावसामुळे शोध मोहिमेत अडथळे येत होते. तरीही सलग तीन दिवस शहरातील भुयार गटार नाल्यात शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र, भुयारी गटारात काहीच आढळून न आल्याने शेवटी ३० सप्टेंबर रोजी पूर्णा नदीपात्रात ‘रेस्कू बोटी’ने शोध मोहीम चालू केली.

घटनास्थळापासून सुमारे १२० कि.मी.अंतरावर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव जवळील पूर्णा नदी पात्रात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पथकाने मृतदेह नदी पात्राच्या बाहेर काढला. नातेवाईकांकडून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.

या प्रकरणात पुढील कारवाई जळगाव जामोद पोलीस पुढील करीत आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे, अकोला महापालिकेच्या अग्निशमन दलाचे मनिष कथले यांच्यासह दलाचे जवान, महापालिकेचे विठ्ठल देवकते, गजानन घोंगे, अलिमखान, सफाई कामगार, कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन पथक, जळगाव जामोद पोलीस घटनास्थळावर उपस्थित होते.

उघड्या नाल्याचा बळी; महापालिकेचा हलगर्जीपणा

महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या हलगर्जीपणामुळे उघड्या नाल्यात शहरातील एका व्यक्तीचा बळी गेला आहे. २७ सप्टेंबर रोजी शहरात जोरदार पाऊस झाला. नदी, नाले दुथडी भरून वाहत होते. टिळक मार्गावर उघड्यावरील भुयारी गटार नाल्यामध्ये एक जण पडला आणि वाहून गेला होता. अखेर तीन दिवसांनंतर मृतदेहच आढळला.