अकोला : राजस्थानमधील बोगस व बनावट रासायनिक खत आणून ते महाराष्ट्रात नामांकित कंपनीच्या नावावर विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाशीम कृषी विभागाने बनावट रासायनिक खताच्या साठवणुकीचा पर्दाफाश करीत मोठी कारवाई केली. या कारवाईत नऊ लाख पाच हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दिनेश चव्हाण नावाच्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील कारपा येथे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण भरारी पथकाने छापा टाकला. छाप्यात कुठलाही मजकूर नसलेल्या ३३० खताच्या रिकाम्या गोण्या आणि नामांकित खत कंपनीचा मजकूर छापलेल्या २७० गोण्या असा एकूण ६०० गोण्यांचा साठा आढळून आला. संशयित साठवणूकदार दिनेश चव्हाण यांची चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत आणि कोणताही विक्री परवाना सादर केला नाही. संबंधित व्यक्ती साध्या बनावट गोण्यांमधील खत नामांकित ब्रँडेड खत कंपनीच्या गोण्यांमध्ये पॅक करत होता. हे बनावट खत राजस्थानमधील येथून आणल्याचे त्यांच्याकडून मिळालेल्या देयकावरून समोर आले. देयकावर साठा ताब्यात असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे किंवा आस्थापनेचे नाव किंवा स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे खत साठा अवैध आणि बोगस असल्याच्या संशयाला दुजोरा मिळाला.
संशयित आरोपी बनावट खत आयात केलेले खत म्हणून विकत असल्याचे दिसून आले. त्याने सादर केलेल्या देयकानुसार, हे खत केवळ २.५० रुपये प्रति किलोग्राम इतक्या कमी किमतीत खरेदी केले होते. आरोपीने केवळ १५० रुपये प्रति गोणी किमतीच्या गोणीवर १४७० रुपये प्रति गोणी किंमत छापून जवळपास आठ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
गोणीवर शासनाच्या सबसिडी क्लेम केल्याचा मजकूर छापून शासनाचीही फसवणूक केली आहे. या गंभीर गुन्ह्यांसाठी संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३, रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील एकूण १४ कलमांखाली मानोरा पोलीस ठाण्यात कृषी अधिकारी संदीप सावळे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत पथक प्रमुख अभिजित देवगिरकर (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद वाशीम), गणेश गिरी (मोहीम अधिकारी), रोशन भागवत (तालुका कृषी अधिकारी, मानोरा), अरुण इंगळे (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक), उमेश राठोड (मंडळ कृषी अधिकारी, मानोरा) आणि संदीप सावळे (कृषी अधिकारी, पंचायत समिती मानोरा) यांचा समावेश होता. पोलीस प्रशासनाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप अल्लापूरकर आणि हेड कॉन्स्टेबल निमाने यांनी सहकार्य केले.