नागपूर : शहराचा वेगाने विकास होत आहे. शहरातील विविध भागांमध्ये नवनवे प्रकल्प राबविण्यासाठी सुमारे दीड हजार वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव दिला गेला. शहरात विकासकार्यासाठी महापालिकेद्वारा वृक्षतोड केली जाते. मात्र वृक्षतोडीच्या मोबदल्यात करण्यात येणारे वृक्षारोपण शहराच्या सीमेच्या बाहेर होत असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले.
वृक्षतोड शहरात होत असेल तर वृक्षारोपण शहरातच व्हायला हवे, अशा शब्दात उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले. विभागीय क्रीडा संकुलासह इतर ठिकाणी प्रस्तावित वृक्षतोडीवर न्यायालयाने अंतरिम स्थगिती देत ही वृक्षतोड थांबविली आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत प्रस्तावित वृक्षतोड करण्यात येऊ नये, असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.
नियमांना डावलून वृक्षतोड?
प्रीती पटेल व इतर तीन पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या मुद्यावर जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. वृक्ष कायद्याच्या तरतुदींच्या नियमांचे पालन न करताच शहरात विविध विकास प्रकल्पांसाठी १ हजार ३७४ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचा आरोप या याचिकाकर्त्याने केला आहे. शिवाय, विकास योजनेचा स्पष्ट आणि अचूक मास्टर प्लॅन उपलब्ध नाही. वृक्ष प्राधिकरणाकडून नियमांचे पालन न करताच जनसुनावणी आयोजित केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बुधवारी सुनावणीदरम्यान, महापालिकेने न्यायालयाला सांगितले की वृक्षतोडीच्या मोबदल्यात गोरेवाडा परिसरात वृक्षारोपण करण्यात येत आहे. न्यायालयाने याबाबत महापालिकेवर नाराजी व्यक्त केली.
वृक्षतोड शहरात होत आहे तर मग शहराच्या बाहेर वृक्ष लावण्यात अर्थ काय? मोबदल्यात होणारे वृक्षारोपण शहराच्या सीमेतच व्हायला हवे, अशा शब्दात न्यायालयाने महापालिकेला खडसावले. केवळ वृक्षारोपण करून भागणार नाही तर वृक्ष जगले की नाही याकडेही लक्ष द्या, अशा सूचनाही न्यायालयाने केल्या.
हेरिटेज वृक्षांचाही समावेश
नागपूर शहरात विविध विकासकामे करण्यासाठी वृक्ष संवर्धन कायद्याच्या अंतर्गत महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे एक हजार ३४७ वृक्ष तोडण्याबाबत प्रस्ताव आले आहे. यापैकी ३६५ वृक्षतोडीचे प्रस्ताव क्रीडा संकुल परिसरातील विकास कार्याबाबत आहे. यात ५८ हेरिटेज वृक्षांचाही समावेश आहे. यात शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, सक्करदरा परिसरात ४२० वृक्ष, विभागीय क्रीडा संकुल, मानकापूरमध्ये ३६५ वृक्ष तसेच मेयो रुग्णालय परिसरात १२९ वृक्षतोड प्रस्तावित आहेत. न्यायालयाने या प्रस्तावित वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती दिली.