बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी महाविकास आघाडीने संतप्त शेतकऱ्यांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांना आज घेराव घातला. यावेळी त्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांना तात्काळ न्याय देण्याची आग्रही मागणी करीत आक्रमक भूमिका घेतली. यामुळे प्रशासन हादरल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हा कार्याध्यक्ष अडव्होकेट प्रसेनजीत पाटील आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या मार्गदर्शनाखाली आज, सोमवारी हे आंदोलन करण्यात आले.

राज्य शासनाच्या वतीने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदानाची (भावांतर योजनेची) घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी ११ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीत जळगाव जामोद तालुक्यातील बहुतांश गावातील हजारो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत.

हेही वाचा – विदर्भात पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी, पण कधी…

शेतकरी पात्र असतानासुद्धा त्यांची नावे अनुदान यादीत आलेली नाहित. त्यामुळे ते अनुदानापासून वंचित राहणार आहेत. मागील वर्षीचा खरीप तथा रब्बीचा पिकविमा मंजूर असूनसुद्धा अद्याप शेतकऱ्यांना वाटप सुरु झालेले नाही. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्रुटी दाखवून डावलले जात आहे. यामुळे अन्याय झालेल्या शेतकऱ्यांच्या वरील मागण्यांसाठी ऍड पाटील आणि दत्ता पाटील यानी शेतकऱ्यांना सोबत घेत आज सोमवारी तालुका कृषी कार्यालय गाठले. तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांना जाब विचारण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते प्रसेनजीत पाटील यांनी ई पीक पाहणीत मोठा घोळ झाल्याचा आरोप करून यामुळे हजारो कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी अनुदान योजनेपासून वंचित राहणार असल्याचे सांगितले. सन २०२३-२४ मधील खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानासाठी पीक विमा मदत जाहीर झाली आहे. मात्र अजूनही याचे वाटप सुरू करण्यात आले नसून ही दिरंगाई का? असा रोखठोक सवाल ऍड पाटील यांनी केला.

यावेळी शेतकऱ्यांनी देखील प्रश्नांची सरबत्ती केल्याने कृषी अधिकारी भांबावून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी कार्यवाहीसाठी अवधी मागितला असता त्यांना १६ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली. यानंतर हा घेराव मागे घेण्यात आला. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे एम.डी. साबीर, प्रमोद सपकाळ, महादेव भालतडक, ईरफान खान, शेख जावेद, यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले.

हेही वाचा – नागपूर : ‘आई, मी मोबाईलमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष केले’, असे लिहून मुलीने संपविले जीवन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान घेरावनंतर प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना प्रसेनजीत पाटील आणि उबाठाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील यांनी कृषी विभागाच्या ढिसाळ कारभाराबद्दल नाराजी बोलून दाखविली. वंचित शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लागल्या नाही तर महाविकास आघाडीतर्फे येत्या शुक्रवारी, १६ ऑगस्टला तालुका कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे जाहीर केले. या आंदोलनात कृषी अधिकाऱ्यांना मागण्यासंदर्भात करण्यात आलेल्या कारवाईचा जाब विचारणार असेही त्यांनी सांगितले. १६ ऑगस्ट रोजीच्या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी, महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन दत्तात्रय पाटील यांनी केले.